खटला सुरू, तरी प्लॉटची विक्री; शिक्षक दाम्पत्याची शिक्षकांकडूनच ५७ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:20 IST2025-03-10T14:14:44+5:302025-03-10T14:20:01+5:30
या प्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरून सात शिक्षकांच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

खटला सुरू, तरी प्लॉटची विक्री; शिक्षक दाम्पत्याची शिक्षकांकडूनच ५७ लाखांची फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कार्यरत शिक्षक दाम्पत्यास न्यायालयामध्ये खटला सुरू असलेला प्लॉट विक्री करून ५७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरून सात शिक्षकांच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जि. प. शिक्षिका अपर्णा धाटबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिटमिटा परिसरातील श्री साईनगर देवगिरी व्हॅलीच्या शेजारील गट नं. १५५मधील प्लॉट नं. १२ व प्लॉट नं. १३ असे दोन्हीचे क्षेत्रफळ ३ हजार ३३० चौरस फूट आहे. या प्लॉटच्या खरेदीचा व्यवहार फिर्यादीसह पती अतुल बागुल यांच्यासोबत आरोपी खुलताबाद येथील मुक्तानंद प्राथमिक शाळेतील शिक्षक सुधाकर पाटील, योगेश पाटील, छाया वाघ, रेखा पाटील, सुभाष पाील, शशिकांत दौंड आणि दिपक पाचपुते यांनी केला. शिक्षक दाम्पत्याने ३६ लाख ३३ हजार रुपयांमध्ये प्लॉट २०१७ मध्ये खरेदी केला. तेव्हा आरोपींनी प्लॉटवर कोणत्याही प्रकारची न्यायालयीन केस सुरू नसल्याचे सांगितले.
शिक्षक दाम्पत्यांनी प्लॉट खरेदीसाठी एचडीएफसी बँकेकडून ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्याशिवाय तारेचे कुंपण टाकण्यासाठी ५० हजार रुपये खर्च केले होते. मात्र, सप्टेंबर २०२४ मध्ये प्लॉटबाबत न्यायालयीन खटला सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यात विक्री करणारे सातही आरोपी प्रतिवादी आहेत. या सर्वांना खटला सुरू असल्याचे माहिती असतानाही त्यांनी विक्री करून फिर्यादीची फसवणूक केली. या प्लॉटच्या खरेदीसाठी शिक्षकांनी घेतलेल्या कर्जाच्या व्याजापोटी आठ वर्षांपासून १७ लाख ८७ हजार रुपये बँकेत भरले. त्यामुळे प्रत्येक खरेदीचे ३६ लाख ३३ हजार, स्टॅम्प ड्युटीचे २ लाख ५० हजार, कुंपणाचे ५० हजार असे एकूण ५७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.