‘वृथा सीण’ आहे संमेलनाचा!
By Admin | Updated: December 21, 2014 00:18 IST2014-12-21T00:08:37+5:302014-12-21T00:18:21+5:30
राजकारण्यांमधील साहित्यिक अशीही एक चर्चा यानिमित्ताने होऊ शकेल. मात्र, याच्याच विरुद्ध ‘साहित्यिकांमधील राजकारणी’ हासुद्धा गंभीर परिसंवादाचा विषय बनू शकतो.

‘वृथा सीण’ आहे संमेलनाचा!
राजकारण्यांमधील साहित्यिक अशीही एक चर्चा यानिमित्ताने होऊ शकेल. मात्र, याच्याच विरुद्ध ‘साहित्यिकांमधील राजकारणी’ हासुद्धा गंभीर परिसंवादाचा विषय बनू शकतो. असो. यावर्षी नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेले ३६ वे मराठवाडा साहित्य संमेलन विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे डिसेंबरमध्ये घेण्याचे ठरले. त्यानंतर डिसेंबर उजाडला तरी कार्यक्रमपत्रिकाही मूर्तरूपात आली नसल्याने विचारणा करताच संयोजकांना मुख्यमंत्र्यांच्या आगमनाचे वेध लागल्याचे स्पष्ट झाले. भाजपाचे कार्यकर्ते असलेल्या उदगीर शाखेच्या मसाप अध्यक्षांनी गेल्या आठवड्यात नागपूरला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, पुढे काय हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, संयोजन समितीने संमेलनाची रूपरेषा अजूनही उघड केलेली नाही. त्यामुळे निरलस, निरपेक्ष साहित्यव्यवहारात ‘राम’ उरला नसल्याचीच भावना रसिकांची झाली आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घेतलेली भूमिका मध्यममार्गी आहे. राजकारण्यांना साहित्यिक मंचावर न येऊ द्यायला संमेलन काय पवित्र गायींचा गोठा आहे का? असा सवाल त्यांनी केला. तर दीर्घकाळ प्रशासनात उच्च पदे भूषवून निवृत्त झालेले देशमुख म्हणतात, ‘साहित्य आणि समाज यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही आणि प्रशासकीय अधिकारी व राजकारणी समाजपरिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना या मंचावर अस्पृश्य मानण्याचे कारण नाही. मात्र, इथे राजकीय व्यक्तिमत्त्वांनीही साहित्यिकांचा सन्मान राखावा आणि मंचाचा राजकीय वापर करू नये. सोबतच साहित्यिकांनीही स्वत:ची आब राखावी, लांगुलचालन करू नये, अशी सूचना देशमुख करतात. मराठवाड्यातीलच एका लोकप्रिय साहित्यिकाने अखिल भारतीय मंचावर ‘शरदाच्या चांदण्या’चे मुक्तकंठाने केलेले गुणगान अजूनही रसिकांच्या चांगले स्मरणात आहे. यासह त्यांच्या भाषणात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या निषेधाचे (अनवधानाने) झालेले विस्मरणही जाणकार चाहते विसरलेले नाहीत. संमेलनास मंत्रिगण उपस्थित राहिले तर एखादा लहान-मोठा निधी वा घोषणा पदरात पडेल, अशी भाबडी आशा संयोजकांना असते. मात्र, आजवर अशा मंत्र्यांनी पोकळ आवेशात दिलेली आश्वासने बहुतेकदा हवेतच विरल्याचा इतिहास आहे आणि समारोपात राजदरबारी मांडलेल्या ठरावांनाही या लोकांनी केराची टोपलीच दाखवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संतश्रेष्ठ तुकोबारायांना भेटीस बोलावले तेव्हा थोडक्या शब्दांत या संताने दिलेले उत्तर मार्मिक आहे. तुकोबा म्हणाले,
‘तुम्हांपाशी आम्ही येऊनियां काय
वृथा सीण आहे चालण्याचा’
सतराव्या शतकात तुकारामांनी स्वाभिमान जपत राजसत्तेला सुनावलेले रोकडे बोल आजही कालसुसंगत आहेत. थोरा-मोठ्यांपुढे बळेच पदर पसरून साहित्यशारदेला किती लाचार बनवायचे याचा विचार शेवटी जबाबदारीची पदे भूषविणाऱ्या संयोजकांनीच करायला हवा. आणीबाणीत १९७५ साली कराडला भरलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या विदूषी दुर्गाबाई भागवत. या काळात लेखन स्वातंत्र्याचा आणि नवनिर्मितीवरील निर्बंध हटविण्याच्या भूमिकेचा पुरस्कार करीत त्यांनी तुरुंगवास भोगला.
मात्र, पदोपदी विषमता आणि विरोधाभास पोसणाऱ्या व्यवस्थेचे कर्ते असलेल्या राजकारण्यांच्या पुढे-पुढे करण्यातच धन्यता मानणारे तथाकथित साहित्यिक हे आजचे वास्तव आहे.
ल्ल शर्मिष्ठा भोसले