निष्काळजीपणा ! सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 07:31 PM2020-07-27T19:31:34+5:302020-07-27T19:37:21+5:30

शहरातील वन्यजीवप्रेमींनी ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जैवविविधता धोक्यात आल्याचे सांगून खंडपीठात धाव घेतली आहे.

Carelessness! Thousands of fish die in Salim Ali Lake | निष्काळजीपणा ! सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत्युमुखी

निष्काळजीपणा ! सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत्युमुखी

googlenewsNext
ठळक मुद्देसरोवरामध्ये दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याचा परिणाम मृत माशांमुळे तलावात दुर्गंधी पसरली आहे.

औरंगाबाद : ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील हजारो मासे अचानक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारही केली आहे.

शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक सलीम अली सरोवराला अगोदरच अतिक्रमणांनी चारही बाजूने वेढले आहे. मागील अनेक वर्षांपासून सरोवराचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा  प्रयत्न होत आहे. महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सरोवराची दिवसेंदिवस वाताहत होत चालली आहे. सरोवराच्या बाजूलाच महापालिकेने एसटीपी प्लांट सुरू केला आहे. दूषित पाण्यावर प्रक्रिया करून पाणी सरोवरात सोडण्यात येते. या परिसरात राहणाऱ्या असंख्य नागरिकांनी आपल्या घरातील ड्रेनेजचे पाणी सरोवरात सोडले आहे. मागील काही वर्षांपासून सरोवरातील दूषित पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाही महापालिका ठोस भूमिका घ्यायला तयार नाही.

शहरातील वन्यजीवप्रेमींनी ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जैवविविधता धोक्यात आल्याचे सांगून खंडपीठात धाव घेतली आहे. अलीकडेच खंडपीठाने सरोवराची पाहणी करण्यासाठी एक स्वतंत्र पथकसुद्धा नेमले होते. त्यानंतर महापालिकेने सरोवरासाठी कोणताही अ‍ॅक्शन प्लॅन हाती घेतला नाही. यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून सरोवरातील पाण्याची पातळी बरीच वाढली आहे. दोन दिवसांपासून सरोवरातील लहान-मोठे मासे अचानक हजारोंच्या संख्येने मरत आहेत. मरण पावलेले मासे पाण्यावर तरंगत असल्याने आसपासच्या नागरिकांना ते दिसत आहेत. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोनाच्या कामात लावण्यात आली आहे. त्यामुळे सरोवराची अवस्था पाहण्यासाठी अधिकारी फिरकलेसुद्धा नाहीत. मृत माशांमुळे तलावात दुर्गंधी पसरली आहे.

दूषित पाणी कारणीभूत
सरोवरात दूषित पाणी येत असल्यामुळे माशांना आॅक्सिजन घेण्यासाठी त्रास होत असेल, म्हणून ते मरण पावत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यापूर्वी अनेकदा असा प्रकार घडला आहे. पूर्वी महापालिका मासेमारी करण्यासाठी व्यावसायिक मंडळींना ठेका देत असे. काही वर्षांपासून ही परंपरा बंद करण्यात आली आहे. 


मासे मरण्याची तीन प्रमुख कारणे
01. सरोवरामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने मासे मरू शकतात.
02. मागील चार महिन्यांपासून नागरिक निर्जंतुकीकरण करणाऱ्या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यांच्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे मासे मरण पावत असतील.
03. सरोवरातील माशाचा मृत्यू एखाद्या आजारामुळे झाला असेल तर त्याची बाधा इतरांनाही होऊ शकते.

Web Title: Carelessness! Thousands of fish die in Salim Ali Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.