निष्काळजी चालकाने ट्रक रस्त्यावरच उभा केला, पाठीमागून दुचाकी धडकून दोन तरूणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:00 IST2025-10-17T12:15:26+5:302025-10-17T13:00:03+5:30
ट्रक चालकाने निष्काळजीपणे रस्त्याला लागूनच ट्रक उभा केल्यामुळे आमच्या मुलांचा बळी गेला. त्यामुळे संबंधित चालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत नातेवाईकांचा रास्तारोको

निष्काळजी चालकाने ट्रक रस्त्यावरच उभा केला, पाठीमागून दुचाकी धडकून दोन तरूणांचा मृत्यू
महालगाव(जि. छत्रपती संभाजीनगर) : वैजापूर-गंगापूर मार्गावर महालगाव(ता. वैजापूर) शिवारातील पंचगंगा साखर कारखान्यासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकवर भरधाव दुचाकी जाऊन धडकली. मंगळवारी (दि. १५) मध्यरात्री साडेबारा वाजता झालेल्या या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. सुरज संजय गायकवाड (वय २४, रा. बाजारतळ, श्रीरामपूर) आणि सुमित विलास धोत्रे (वय २०, रा. आमराई, बारामती, जि. पुणे) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
सुरज व सुमित हे कामानिमित्त वैजापूर येथे रूम करून राहतात. मंगळवारी गंगापूर शहरात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम केले. रात्री ते दुचाकीने वैजापूरकडे निघाले हाेते. दरम्यान, महालगाव शिवारात पंचगंगा साखर कारखान्यासमोर रस्त्याच्या कडेला एक ट्रक उभा होता. या ट्रकला सुरज व सुमित यांची भरधाव दुचाकी मागून धडकली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अशोक माने, हवालदार विजय बाम्हदे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. विकी संकपाळ यांनी रुग्णवाहिकेतून दोघांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
नातेवाइकांकडून रास्ता रोको
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सुमित व सुरज यांच्या नातेवाइकांनी महालगाव शिवारातील घटनास्थळी धाव घेत बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. ट्रक चालकाने निष्काळजीपणे रस्त्याला लागूनच ट्रक उभा केल्यामुळे आमच्या मुलांचा बळी गेला. त्यामुळे संबंधित चालकावर गुन्हा दाखल करावा, अशी त्यांची मागणी होती. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, रास्ता रोकोमुळे काही काळ मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.