छत्रपती संभाजीनगरात पत्त्यांचे क्लब रडारवर, नामांकित व्यक्तींसह ७६ ‘गॅम्बलर’ गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:42 IST2025-06-14T11:38:17+5:302025-06-14T11:42:50+5:30

पत्त्यांच्या क्लबवर नामांकित क्षेत्रातील व्यक्तींची उठबस; गुन्हे शाखेच्या पोलिसांचे छत्रपती संभाजीनगरात दोन ठिकाणी छापे, लाखोंची रोकड जप्त

Card club on radar in Chhatrapati Sambhajinagar, 76 'gamblers' busted, cash worth lakhs seized | छत्रपती संभाजीनगरात पत्त्यांचे क्लब रडारवर, नामांकित व्यक्तींसह ७६ ‘गॅम्बलर’ गजाआड

छत्रपती संभाजीनगरात पत्त्यांचे क्लब रडारवर, नामांकित व्यक्तींसह ७६ ‘गॅम्बलर’ गजाआड

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांनी शहरातील बड्या पत्त्यांच्या क्लबवर लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी शुक्रवारी रात्री एकाच वेळी धाडी टाकल्या. चिश्तिया चौकात ७६ व पडेगावच्या अड्ड्यावर ७ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी लाखो रुपयांची मोजदाद सुरू होती.

काही अवैध व्यवसायांच्या विरोधात दीर्घ काळापासून कारवाई होत नव्हती. शहर पोलिस दलात मोठे फेरबदल झाल्यानंतर अशी मोहीम राबवली जाण्याची चर्चा सुरू होतीच. शुक्रवारी गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी मोठ्या फौजफाट्यासह चिश्तिया चौकातील फिझा हॉटेलच्या इमारतीच्या वरील दोन मजल्यांवर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रवीण जैस्वालच्या पत्त्याच्या क्लबवर छापा मारला. सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक संदीप सोळुंके, विशाल बोडखे, संदीप शिंदे यांच्यासह त्यांनी सायंकाळी ७ वाजता प्रवेश केला. पोलिस आल्याचे पाहताच क्लबमध्ये हलकल्लोळ उडाला. बाहेर बघ्यांची माेठी गर्दी जमली होती.

नामांकित क्षेत्रातील व्यक्तींची उठबस
रात्री ११:३० वाजेपर्यंत २५ पेक्षा अधिक टेबलांवरील लाखो रुपयांची रोकड जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होती. ७६ जुगाऱ्यांसह क्लबमध्ये काम करणाऱ्या ८ कर्मचाऱ्यांनादेखील आरोपी करण्यात आले. ७६ जुगाऱ्यांमध्ये शासकीय सेवेतील नामांकित व्यक्ती, राजकीय नेत्यांचे सहायक, कार्यालयात काम करणारे कर्मचारीही सापडले.

करोडोंची उलाढाल
जैस्वालच्या या क्लबवर रोज जवळपास १०० जुगारी पत्ते खेळण्यासाठी येत. २५ पेक्षा अधिक टेबलांवरून रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. जैस्वालसह सर्व जुगाऱ्यांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पडेगावमध्येही छावणी पोलिसांनी सात जुगाऱ्यांना पकडत ८४ हजार रुपये रोकड आणि १० लाख रुपयांचे मोबाइल, वाहने जप्त केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितले.

Web Title: Card club on radar in Chhatrapati Sambhajinagar, 76 'gamblers' busted, cash worth lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.