सासऱ्यांच्या अस्थी विसर्जनासाठी कायगावकडे जाताना कारला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 12:31 IST2021-05-03T12:30:46+5:302021-05-03T12:31:22+5:30
Burning Car औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावर चालत्या वाहनाला आग लागून भस्मसात होण्याची ही दुसरी घटना आहे.

सासऱ्यांच्या अस्थी विसर्जनासाठी कायगावकडे जाताना कारला आग
औरंगाबाद : सासऱ्यांच्या अस्थी विसर्जनासाठी कायगावकडे जाणाऱ्या कारला अचानक आग लागून ती भस्मसात झाल्याची घटना शनिवारी सकाळी नगर रोडवर गोलवाडी रेल्वे उड्डाण पुलाजवळ घडली. यावेळी प्रसंगावधान राखून वेळीच कार रस्त्याकडेला थांबवून त्यातील जावई, मुलगी आणि अन्य दोन असे चारजण सुखरुप बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
उस्मानपुरा परिसरातील द्वारकापुरी येथील समाधान गवई यांचे सासरे मारुतीराव परशुराम मोरे यांचे दोन दिवसांपूर्वी अल्प आजाराने निधन झाले. त्यामुळे शनिवारी सकाळी ९.३०च्या सुमारास जावई समाधान गवई, मुलगी डॉ. दीपाली मोरे व अन्य दोन नातेवाईक कार क्रमांक (एमएच २०- डीवाय- ३३०७)मधून मारुतीराव मोरे यांची अस्थी घेऊन कायगाव येथे विसर्जन करण्यासाठी निघाले होते. दरम्यान, गोलवाडीजवळील उड्डाणपुलाजवळ ही कार येताच अचानक आग लागली. हा प्रकार लक्षात येताच तत्काळ रस्त्याकडेला कार उभी करुन त्यातून दोन पुरुष व दोन महिला तत्काळ बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत कार भस्मसात झाली. या घटनेत कारचे ५ लाखांचे नुकसान झाले.
ही घटना पाहण्यासाठी जाणारी-येणारी वाहने थांबल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली होती. या घटनेची माहिती मिळताच छावणी ठाण्याचे दिलीप गांगुर्डे, वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंखे यांनी वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी अग्निमशन दलाला पाचारण केल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक प्रमुख एल. पी. कोल्हे, विनायक लिमकर, संग्राम मोरे, अक्षय नागरे, परमेश्वर साळुंके, सुभाष दुधे, आदींनी घटनास्थळी येत अथक परिश्रमानंतर कारला लागलेली आग नियंत्रणात आणली.
महिनाभरातील दुसरी घटना
औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावर चालत्या वाहनाला आग लागून भस्मसात होण्याची ही दुसरी घटना आहे. ८ एप्रिल रोजी भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची १०८ रुग्णवाहिका (एमएच १४ - सीएल - ०७९३) ही औरंगाबादच्या दिशेने निघाली होती. वाळूजजवळ सायंकाळी ४.३०च्या सुमारास चालक सचिन कराळे यांना रुग्णवाहिकेतून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी प्रसंगावधान राखत रस्त्याकडेला रुग्णवाहिका उभी केली व डॉक्टर, चालक यांनी रुग्णवाहिकेतून खाली उड्या मारल्या. या घटनेत रुग्णवाहिका जळून खाक झाली.