कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना घरी बोलावून वैयक्तिक कामे, महिला अधिकाऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:37 IST2025-08-07T11:35:59+5:302025-08-07T11:37:49+5:30
या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना घरी बोलावून वैयक्तिक कामे, महिला अधिकाऱ्यावर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : सामाजिक कल्याण वसतिगृहात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्यांना महिलांना घरी बोलावून वैयक्तिक कामे करायला लावून अपमानित केल्याप्रकरणी विभागाच्या तत्कालीन उपायुक्त तथा विभागीय जात पडताळणी समिती सदस्य जयश्री सोनकवडे व वॉर्डन वैशाली कळासरे यांच्यावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एका महिलेच्या आरोपानुसार, २०२३ मध्ये त्या कंपनीमार्फत समाजकल्याण विभागात सफाई कामगार म्हणून रुजू झाल्या होत्या. एप्रिल महिन्यात कळासरे यांनी त्यांच्यासह अन्य महिला कर्मचाऱ्यांना सोनकवडे यांच्या पडेगावच्या घरी काम करण्यासाठी जाण्यास सांगितले. कामावरून काढून टाकण्याच्या धमक्यांमुळे इच्छा नसताना आम्ही काम करायला गेलो. मात्र, सोनकवडे त्यांच्याकडून मालिश करवून घेण्यासह सर्व प्रकारचे घरगुती काम करवून घेत होत्या. त्यात चूक झाल्यास अश्लील शिवीगाळ करीत होत्या. याप्रकरणी त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांच्याकडे तक्रार दिली. त्यावरून बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक सचिन गाडेकर अधिक तपास करीत आहेत.