बसपोर्टच्या कामाला लवकरच मुहूर्त, सिडकोऐवजी चिकलठाणा कार्यशाळेतून धावणार एसटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:40 IST2025-11-05T19:38:11+5:302025-11-05T19:40:00+5:30
सिडकोऐवजी मुकुंदवाडी चौक गाठा; बसस्थानकाचे लवकरच स्थलांतर

बसपोर्टच्या कामाला लवकरच मुहूर्त, सिडकोऐवजी चिकलठाणा कार्यशाळेतून धावणार एसटी
छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतीक्षित बसपोर्टच्या कामाला लवकरच मुहूर्त मिळणार आहे. बसपोर्टचे काम सुरू करण्यासाठी सिडको बसस्थानकाचे स्थलांतर चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने एसटी महामंडळाकडून तयारी सुरू आहे.
राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरातील सिडको बसस्थानकाच्या जागी होणाऱ्या बसपोर्टच्या कामाचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले; परंतु नंतर कामाला सुरुवात झालीच नाही. तब्बल ६ वर्षांनंतर बसपोर्टचे काम सुरू करण्याच्या हालचाली आहेत. बसपोर्टसाठी सिडको विभाग, मनपाकडून आवश्यक त्या परवान्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पर्यावरणासह अन्य काही ‘एनओसी’ मिळविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यात बसस्थानक असलेल्या जागेवर बांधकाम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले.
सिडकोऐवजी मुकुंदवाडी चौक गाठा
एसटी महामंडळाची मध्यवर्ती कार्यशाळा ही मुकुंदवाडी चौकापासून काही अंतरावर आहे. सिडको बसस्थानकातून विदर्भासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांसाठी बस धावतात. आगामी काही दिवसांत प्रवाशांना सिडको बसस्थानकाऐवजी मुकुंदवाडी चौक गाठून एसटी पकडावी लागेल.
असे असेल बसपोर्ट
- विमानतळाच्या धर्तीवर उभारणी.
- ३१ प्लॅटफॉर्म.
- सिटी बसचे ४ प्लॅटफॉर्म.
- ‘डोम’ म्हणजे मध्यवर्ती प्रतीक्षालय
- वातानुकूलित विश्रामगृह.
- सरकता जिना.
- व्यापारी संकुल, वाहनतळ
- दीडशे लोकांच्या क्षमतेचे फूड कोर्ट
महिनाभरात स्थलांतराचे नियोजन
बसपोर्टच्या कामासाठी आवश्यक त्या ‘एनओसी’ घेतल्या जात आहेत. बसपोर्टच्या कामामुळे सिडको बसस्थानकाचे स्थलांतर चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिनाभरात स्थलांतर होईल, असे नियोजन केले जात आहे.
- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक