औरंगाबादजवळ बस आणि टेंपोचा भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:20 IST2018-05-09T14:19:38+5:302018-05-09T14:20:21+5:30
फुलंब्रीकडे जाणारी बारामती - रावेर बस आणि औरंगाबादच्या दिशेने येणारा आयशर टेंपो यांच्यात दुपारी १.३० च्या दरम्यान भीषण अपघात झाला.

औरंगाबादजवळ बस आणि टेंपोचा भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी
औरंगाबाद : फुलंब्रीकडे जाणारी बारामती - रावेर बस आणि औरंगाबादच्या दिशेने येणारा आयशर टेंपो यांच्यात दुपारी १.३० च्या दरम्यान भीषण अपघात झाला. यात जवळपास २५ प्रवासी जखमी असून ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
औरंगाबाद बसस्थानकावरून बारामती ते रावेर ही बस ( एमएच २० -बीएल ३१०० ) दुपारी एक वाजता जळगाव कडे जाण्यास निघाली. बसने हर्सूलच्या पुढील सावंगी टोलनाका ओलांडल्यानंतर काही अंतर पार करताच समोरून येणाऱ्या टेंपो ( एमएच १८ -एए ५४५४ ) सोबत जोराची टक्कर झाली. दोन्ही वाहने वेगात असल्याने टेंपोच्या धडकेने बसची उजवी बाजू अक्षरशः कापली गेली. याबाजूने बसलेले सर्वच प्रवासी गंभीर जखमी झाले. तर डाव्याबाजूने बसलेली प्रवास्यांना मुकामार लागला. यात २५ प्रवासी जखमी असून यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना खाजगी रुग्णवाहिकेद्वारे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जोरदार आवाजाने सारेच घाबरले
दोन्ही वाहने वेगात पुढे जात असल्याने त्यांची समोरासमोर धडक होताच मोठा आवाज झाला. यामुळे बसमधील सर्व प्रवासी प्रचंड घाबरून गेले. बाहेर कसे पडायचे या विंवचनेत काही जण ओरडत होती तर लहान मुलांना रडू कोसळले. त्यांना मदतीसाठी आलेल्या लोकांनी बाहेर काढत धीर दिला.
अपघात होताच आजूबाजूचे लोकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. दोन्ही गाड्यांच्या केबिन पूर्णतः चिरल्या गेल्या होत्या. यामुळे दोन्ही चालक त्यात अडकून पडली होती. लोकांनी केबिन तोडून त्यांना ओढून बाहेर काढले.