सराफा बाजारात ‘बंपर धमाका’; सोन्या-चांदीच्या दरवाढीला ‘राॅकेटगती’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:32 IST2025-10-14T14:15:47+5:302025-10-14T15:32:23+5:30
पूर्वी भाव वाढले की बाजार शुकशुकाट! आता 'आणखी वाढेल' या अंदाजाने खरेदी. तुमचा अंदाज काय सांगतो?

सराफा बाजारात ‘बंपर धमाका’; सोन्या-चांदीच्या दरवाढीला ‘राॅकेटगती’
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे फटाक्यांच्या दुकानांची सजावट होत असताना, दुसरीकडे सराफा बाजारात खऱ्या अर्थाने दरवाढीचा ‘बंपर धमाका’ सुरू आहे. सोने-चांदीच्या दरात दररोज ॲटमबॉम्बचे धमाके होत आहेत. सोमवारी तर रॉकेटच्या गतीने या दोन मौल्यवान धातूंचे भाव वाढले. यामुळे गुंतवणूकदारांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करणे सुरू केले आहे.
फराळांचा सुगंध, फटाक्यांची आतषबाजी आणि सोन्या-चांदीची खरेदी, या तिन्हीचा संगम यंदा अधिक रंगतदार ठरत आहे. दरवाढीमुळे सराफा बाजारात ग्राहकांची चौकशी व खरेदी दोन्ही वाढल्या आहेत. गुंतवणूकदारांनी या वाढीला ‘दिवाळी बोनस’ मानत खरेदीला सुरुवात केली आहे.
पूर्वी शुकशुकाट, आता गर्दी
पूर्वी सोन्या-चांदीचे भाव वाढत असताना सराफा बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत असे; पण आता चक्र फिरले आहे. खरेदीदारांची मानसिकता बदलली असून, आणखी भाववाढ होईल, असे अंदाज घेऊन खरेदी केली जात आहे. यामुळे ज्वेलर्सच्या प्रत्येक शोरूममध्ये गर्दी दिसत आहे.
चांदीची किंमत १ लाख ८१ हजार रुपये
चांदीच्या किमतीत मागील वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी एका दिवसात चांदीत रॉकेटसारखी एकदम १५०० रुपयांनी वाढ झाली. सायंकाळपर्यंत प्रतिकिलो चांदीचे भाव १ लाख ८१ हजार रुपयांपर्यंत पोहोचले.
सोने १ लाख २७ हजार रुपये
चांदीप्रमाणेच सोनेही मागील वर्षभर भाववाढीचे नवनवीन विक्रम स्थापित करत आहे. सोमवारी दिवसभरात सोन्याचे भाव १ हजार रुपयांनी वाढून १ लाख २७ हजार ५०० रुपये प्रतितोळा झाले.
का वाढले भाव?
सोने-चांदीच्या भाववाढीमागे अनेक कारणे सांगितली जात आहेत :
१) अमेरिकेतील सरकारी शटडाउन आणि फ्रान्समधील राजकीय संकटामुळे जागतिक वित्तीय बाजारात अस्थिरता वाढली आहे.
२) यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात सातत्याने कपात केली आणि डॉलर कमकुवत झाला, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात रस दाखवला आहे.
३) केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले, ज्यामुळे किमती वाढल्या आहेत.
४) भारताची सोन्याची मागणी प्रामुख्याने आयातीवर अवलंबून आहे. यावर्षी रुपया ३.८ टक्के कमकुवत झाला आहे, ज्यामुळे रुपयामध्ये सोनं अधिक महाग झाले आहे.
५) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या सोन्याचा साठा ८.१ टक्के (२०२३) वरून वाढवून १४ टक्के (सप्टेंबर २०२५) पर्यंत केला आहे.
ज्वेलर्सना मिळेना चांदी
शहरातील ज्वेलर्सकडे चांदी व सोन्याचा व दागिन्यांचा मुबलक साठा आहे. मात्र, सध्या दागिन्यांसाठी ज्वेलर्स चांदी खरेदी करत आहेत; पण आरटीजीएस केल्यानंतर आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांनी चांदी मिळत आहे. देशात चांदीचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे.
- जुगलकिशोर वर्मा, ज्वेलर्स