खाम नदीच्या प्रवाहात बैलगाडी उलटली; ऐन हंगामात बैलजोडीचा मृत्यू, शेतकरी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:50 IST2025-10-17T14:45:50+5:302025-10-17T14:50:02+5:30
मृत बैलांचे आर्थिक व भावनिक मूल्य शेतकऱ्यासाठी मोठे असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खाम नदीच्या प्रवाहात बैलगाडी उलटली; ऐन हंगामात बैलजोडीचा मृत्यू, शेतकरी जखमी
वाळूज महानगर : गंगापूर तालुक्यातील नारायणपूर (बू) येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका शेतकऱ्याची बैलगाडी खाम नदीच्या जोरदार प्रवाहात उलटली. २ बैलांचा मृत्यू झाला, तर शेतकरी शेख जमील शब्बीर हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख जमील शब्बीर हे दररोजप्रमाणे शेतातील कामकाज आटोपून बैलगाडीसह घरी परतत होते. दरम्यान, गावाजवळील खाम नदी पार करत असताना प्रवाह अचानक वाढल्याने बैलगाडीचा तोल गेला आणि ती पाण्यात पलटी झाली. प्रवाह एवढा तीव्र होता की, दोन्ही बैल वाहून गेले. काही अंतरावर त्यांचे मृतदेह आढळले. दरम्यान, शेख जमील यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत काठावर पोहोचले. परंतु, त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात शेतकऱ्याचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मृत बैलांचे आर्थिक व भावनिक मूल्य शेतकऱ्यासाठी मोठे असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी उदय कुलकर्णी आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून संबंधित अहवाल तयार केला आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेबद्दल नारायणपूर गावचे सरपंच नाशेर पटेल यांनी शोक व्यक्त करत कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाकडून शेतकरी शेख जमील शब्बीर यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी या घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदत मिळविण्याचे आश्वासनही दिले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांनी वाहत्या पाण्यातून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात येत आहे.