राजकीय हस्तक्षेप फोल! छ. संभाजीनगरातील कॅन्सर हॉस्पिटलच्या पाठीमागील २२ घरांवर बुलडोझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:09 IST2026-01-23T15:09:33+5:302026-01-23T15:09:56+5:30

राजकीय पक्षांनी दोन वेळेस थांबविली होती मनपाची कारवाई

Bulldozers destroy 22 houses behind Cancer Hospital in Chhatrapati Sambhajinagar | राजकीय हस्तक्षेप फोल! छ. संभाजीनगरातील कॅन्सर हॉस्पिटलच्या पाठीमागील २२ घरांवर बुलडोझर

राजकीय हस्तक्षेप फोल! छ. संभाजीनगरातील कॅन्सर हॉस्पिटलच्या पाठीमागील २२ घरांवर बुलडोझर

छत्रपती संभाजीनगर : आमखास मैदान समोरील कॅन्सर हॉस्पिटलच्या पाठीमागील भाग म्हणजे रऊफ कॉलनी, कबाडीपुरा होय. हॉस्पिटलच्या भिंतीला लागूनच मागील अनेक दशकांपासून नागरिकांनी रस्त्यावरच घरे बांधली होती. महापालिकेने यापूर्वी दोन वेळेस कारवाईचा प्रयत्न केला. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हस्तक्षेप करीत कारवाई थांबविली होती. मागील दोन ते तीन दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने नागरिकांना नोटिसा देणे, स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची विनंती केली. कोणीतरी राजकीय व्यक्ती येईल, कारवाई थांबवेल या आशेवर असलेल्या मालमत्ताधारकांच्या २२ घरांवर आज मनपाने बुलडोझर फिरविला.

कॅन्सर हॉस्पिटलमधून बाहेर पडणाऱ्या ड्रेनेजच्या पाईपसाठी ही जागा शिल्लक नव्हती. सहा महिन्यांपूर्वी दोन घरे पाइप टाकण्यासाठी पाडण्यात आली होती. उर्वरित घरांमुळे या भागातून दुचाकी आणि रिक्षा ये-जा करू शकत होती. चारचाकी वाहन जात नव्हते. महापालिकेने अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा पाठवून मालकी हक्काची कागदपत्रे सादर करा असे आवाहन अनेकदा केले. मात्र, कोणीही पुढे आले नाही. आयुक्त जी. श्रीकांत यांनी रस्ता मोकळा करण्याचे आदेश अलीकडेच दिले होते. त्यानुसार गुरूवारी दुपारी कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटाव विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहूळे यांनी भेट देऊन पाहणी व मार्गदर्शन केले. दोन जेसीबी मशीनच्या साहाय्याने व मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली.

दिवसभरात २२ घरे पाडली
कारवाईत नागरिकांच्या घरातील साहित्याचे नुकसान होऊ नये, यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पत्रे, पाण्याच्या टाक्या व इतर साहित्य सुरक्षितपणे बाहेर काढून दिले. सुरुवातीला काही नागरिकांनी विरोध दर्शविला, मात्र पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, मनपाच्या उपायुक्त सविता सोनवणे यांनी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दिवसभरात एकूण २२ घरे पाडण्यात आली. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, संजय सुरडकर, सुंदर सागर श्रेष्ठ, रवींद्र देसाई, माजी सैनिक प्रमोद जाधव यांच्यासह महापालिका व पोलिस प्रशासनाची संपूर्ण टीमने केली.

Web Title : राजनीतिक हस्तक्षेप विफल: कैंसर अस्पताल के पास 22 घर तोड़े गए

Web Summary : राजनीतिक हस्तक्षेप विफल होने पर छत्रपति संभाजीनगर में कैंसर अस्पताल के पास बने 22 अवैध घरों को तोड़ा गया। नगरपालिका ने कार्रवाई रोकने के प्रयासों के बावजूद, जल निकासी और सड़क पहुंच के लिए क्षेत्र को साफ़ करने के लिए नोटिस जारी किए और संरचनाओं को ध्वस्त कर दिया।

Web Title : Political Interference Fails: Bulldozers Raze 22 Homes Near Cancer Hospital

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar demolished 22 illegally constructed homes near a cancer hospital after political interventions to halt the action failed. The municipality issued notices and removed belongings before demolishing the structures to clear the area for drainage and road access.