फ्लॅटबाबत बिल्डरने फसवले; तिन्ही तक्रारकर्त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसानभरपाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:35 IST2025-05-15T12:31:11+5:302025-05-15T12:35:02+5:30
मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी प्रत्येकी ५० हजार रुपये द्या - राज्य आयोग

फ्लॅटबाबत बिल्डरने फसवले; तिन्ही तक्रारकर्त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसानभरपाईचे आदेश
छत्रपती संभाजीनगर : तिन्ही तक्रारकर्त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसानभरपाई तसेच मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी प्रत्येकी ५० हजार रुपये तक्रार दाखल झाल्यापासून ९ टक्के व्याजासह देण्याचे आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या औरंगाबाद खंडपीठाने गोल्डन ड्रीम्स बिल्डर्स प्रा. लि. यांना दिले.
तसेच आदेशापासून ३ महिन्यांत करारात नमूद सर्व सोयीसुविधा आणि पूर्णत्वाचे प्रमाणपत्रही देण्याचे आदेश पीठासीन अधिकारी मिलिंद सोनवणे व सदस्य डॉ. निशा चव्हाण आणि नागेश कुंबरे यांनी दिले आहेत.
काय होती तक्रार ?
याप्रकरणी मंजूषा सुनील भराडकर, सुनील भराडकर यांनी संयुक्तपणे आणि सौरभ सुभाष भराडकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अर्जदारांनी गोल्डन ड्रीम्स बिल्डर्स प्रा. लि. यांच्याकडे त्यांच्या गोल्डन ड्रीम्स आयटी बिझिनेस पार्क येथे २८ मार्च २०१२ ला २७ लाख ८१ हजार रुपयांना फ्लॅट बुक केला होता. सौरभ यांनी २०१३ मध्ये १९ लाख ८० हजार रुपयांना फ्लॅट बुक केला. यावेळी झालेल्या करारानुसार संपूर्ण सोयी-सुविधांसह फ्लॅटचा ताबा एका वर्षात देण्यात येणार होता. या प्रकल्पात एकंदर २५ सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले होते. तक्रारदारांना फ्लॅटचा ताबा वेळेत दिला नाही, करारात नमूद केल्याप्रमाणे सोयीसुविधा पुरविल्या नाहीत तसेच ‘पूर्णत्वाचे प्रमाणपत्र’ दिले नसल्यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली होती. एका वर्षात ताबा देण्याचे कबूल करूनही प्रत्यक्षात २०१७ मध्ये त्यांना ताबा देण्यात आला. त्यातही सुविधांचा अभाव आणि पूर्णत्व प्रमाणपत्र मिळालेच नाही. मंचात तक्रार दाखल करून अर्जदारांनी नुकसानभरपाई आणि सर्व सोयी-सुविधा पुरविण्याचे आदेश देण्याची विनंती केली. अर्जदारांच्या वतीने ॲड. नसीम शेख यांनी काम पाहिले.