राज्यभर गाजलेल्या प्रा. राजन शिंदे हत्याकांडात अल्पवयीन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:54 IST2025-12-10T13:52:38+5:302025-12-10T13:54:57+5:30
जळफळाट, राग, डार्क वेब आणि खून! राज्याला हादरवलेल्या प्रा. राजन शिंदे प्रकरणाचा शेवट, अल्पवयीन आरोपीला जन्मठेप

राज्यभर गाजलेल्या प्रा. राजन शिंदे हत्याकांडात अल्पवयीन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
छत्रपती संभाजीनगर: मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या निर्घृण खून प्रकरणी छत्रपती संभाजीनगर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. खुनाच्या घटनेवेळी अल्पवयीन असलेल्या, परंतु नंतर प्रौढ समजण्यात आलेल्या विधिसंघर्षग्रस्त बालकास (विसंबा) न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. केवळ 'एक वाक्य' तात्कालिक कारण ठरलेल्या या खुनाच्या घटनेत, गुन्ह्याच्या क्रूरतेमुळे आणि पूर्वनियोजित तयारीमुळे अल्पवयीन आरोपीलाही कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळाली आहे.
'त्या' एका वाक्याचा भयावह शेवट
१० ऑक्टोबर २०२१ रोजी डॉ. शिंदे यांच्या राहत्या घरी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दोन तासांपूर्वी डॉ. शिंदे आणि 'विसंबा'मध्ये वाद झाला होता. रागाच्या भरात डॉ. शिंदे यांनी आरोपीस ‘एकतर तू राहशील, नाहीतर मी राहील’ असे म्हटले होते. यामुळे 'ते आपल्याला मारतील' या भीतीपोटी हे कृत्य केल्याची कबुली 'विसंबा'ने दिली होती.
डंबेलने केले वार
पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रानुसार, याच भीतीपोटी आरोपीने डॉ. शिंदे गाढ झोपेत असताना पहाटे २.३० ते ३ वाजेच्या दरम्यान व्यायामाचे वजनदार डंबेल पाच वेळा पाठीमागून डोक्यावर मारले. त्यानंतर चाकूने त्यांचा गळा कापून डंबेलने कपाळ, कान, डोळ्याजवळ, चेहरा व मानेवर वार केले, तसेच खोलवर गळा आणि दोन्ही हाताच्या नसा कापल्याचे उघड झाले होते.
टीओआर, डार्क वेब आणि पूर्वनियोजित कट
पोलिसांच्या तपासात आरोपीने खुनाची पूर्व तयारी केल्याचे उघड झाले होते. आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मर्डर मिस्ट्री, व्हायलेट आणि मर्डर रिलेटेड क्राईम चित्रपट आणि वेबसिरीज पाहिल्या होत्या. त्याने वेगवेगळ्या वेब ब्राउझरद्वारे 'खून कसा करायचा' आणि 'पुरावे कसे नष्ट करायचे' याबद्दल सर्च केले होते. विशेष म्हणजे, सर्च केलेली ही माहिती पोलिसांना मिळू नये म्हणून त्याने 'डार्क वेब' साठी लागणारे 'टीओआर' हे वेब ब्राऊझर वापरल्याचे तपासात स्पष्ट झाले.
पोलिसांच्या तपासाला यश
आरोपीने खुनाची कबुली अतिशय जवळच्या नातेवाइकांसमोर रडून मिठी मारत दिली होती, हा कबुलीजबाब पोलिसांनी इन कॅमेरा नोंदवला होता. गुंतागुंतीच्या या प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सहकाऱ्यांसह तत्परतेने सखोल तपास करत ठोस पुरावे मिळवले होते. विहिरीत फेकून दिलेले गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यार शोधून काढणे, डार्क वेबचा वापर करून, क्राईम सिरीज पाहून पूर्वनियोजित कट केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.
प्रौढ समजून खटला चालवण्यास मंजुरी ते जन्मठेप
पोलिसांच्या दोषारोपपत्रातील या धक्कादायक बाबींमुळे, १७ वर्षे ८ महिन्याच्या या 'विसंबा'ला 'जेजे ॲक्ट'च्या तरतुदीनुसार प्रौढ समजण्यात आले आणि त्याचा खटला सत्र न्यायालयासमोर चालविण्यात आला. अनेक वर्षांपासून असलेल्या विसंवादातून आणि साचलेल्या रागातून घडलेल्या या क्रूर कृत्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.