भावांनी चोळीबांगडी दिली नाही, नाराज बहिणी कोर्टात; कोर्टाने दिला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:58 IST2025-06-17T19:57:45+5:302025-06-17T19:58:25+5:30

अर्जदारांना त्यांच्या माहेरची मंडळी जवळ करीत नसल्याने त्यांनी त्यांच्या भावाकडे वडिलांच्या संपत्तीत समान हिस्सा मागितला. मात्र, त्यांनी हिस्सा देण्यास नकार दिला.

Brothers did not give me a choli bangle, upset sister goes to court; Court gives her share in father's property | भावांनी चोळीबांगडी दिली नाही, नाराज बहिणी कोर्टात; कोर्टाने दिला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा

भावांनी चोळीबांगडी दिली नाही, नाराज बहिणी कोर्टात; कोर्टाने दिला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा

छत्रपती संभाजीनगर : सख्खे भाऊ, भावजयी चोळीबांगडी करीत नाहीत. सन्मान देत नाहीत. अशा स्थितीत नाराज झालेल्या दोन बहिणींनी वडिलोपार्जित संपत्तीत समान हिस्सा मिळावा म्हणून केलेला दावा कोर्टाने मंजूर केला आहे. ५५ एकर ३४ गुंठे शेतजमिनीत अर्जदारांना समान वाटा देण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश ए. डी. बोस यांनी दिले.

याविषयी अधिक माहिती अशी की, अर्जदार जनाबाई अशोक ढोकळे (रा. अरिहंतनगर) आणि अरुणा कृष्णा तौर (रा. विष्णूनगर) या दोघी बहिणींचे माहेर ढाकेफळ (ता. पैठण) येथे आहे. तेथे त्यांची वडिलाेपार्जित ५५ एकर ३४ गुंठे इतकी जमीन आणि दोन भूखंड आहेत. त्यांना भाऊसाहेब लक्ष्मण काळे, परसराम लक्ष्मण काळे हे दोन भाऊ, तर विवाहित मोठी बहीण मीराबाई उघडे, लहान बहीण भामाबाई राजेश धुमाळ अशी ही भावंडे आहेत. अर्जदारांच्या वडिलांचे निधन २०१० मध्ये झालेले आहे. 

अर्जदारांना त्यांच्या माहेरची मंडळी जवळ करीत नसल्याने त्यांनी त्यांच्या भावाकडे वडिलांच्या संपत्तीत समान हिस्सा मागितला. मात्र, त्यांनी हिस्सा देण्यास नकार दिला. यामुळे नाराज होऊन दोन बहिणींनी ॲड. उद्धव वाघ यांच्यामार्फत ३१ मार्च २०२१ रोजी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्यात त्यांनी त्यांची आई वत्सलाबाई काळे , दोन्ही भाऊ आणि बहीण यांना प्रतिवादी केले होते. उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश ए. डी. बोस यांनी जनाबाई ढोकळे आणि अरुणा तौर यांचा दावा मंजूर केला. वडिलांच्या संपत्तीत मुले आणि मुलींचा समान हक्क असल्याचे नमूद करीत अर्जदार दोन्ही बहिणींसह प्रतिवादी आई, दोन भाऊ आणि बहिणी यांच्यात समान वाटा करून सातवा हिस्सा त्यांना देण्याचे आदेशित केले.

Web Title: Brothers did not give me a choli bangle, upset sister goes to court; Court gives her share in father's property