वाहन परवान्यासाठी साडेसात हजाराची लाच; पंटरसह आरटीओ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 15:50 IST2021-07-13T15:45:03+5:302021-07-13T15:50:29+5:30
RTO officers arrested by ACB : आरटीओ कार्यालयात मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने एका खासगी व्यक्तीला एका जणाकडून लाच घेताना पकडले.

वाहन परवान्यासाठी साडेसात हजाराची लाच; पंटरसह आरटीओ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
औरंगाबाद : ड्रायव्हिंग स्कूल चालकाकडून ग्राहकांचा वाहन चालविण्याचा परवाना मंजूर करण्यासाठी खाजगी पंटरमार्फत 7 हजार 500 रुपये लाचे घेताच मुंबई एसीबी पथकाने येथील आरटीओ कार्यालयात सापळा रचून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने आनि त्याचा पंटर अभिजित पवार यास सोमवारी दुपारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मध्यरात्रीनंतर वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
आरटीओ कार्यालयात सोमवारी दुपारी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने एका खासगी व्यक्तीला एका जणाकडून लाच घेताना पकडले. यानंतर पथकाने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल मानेस दालनातून ताब्यात घेतले. या कारवाईची चर्चा दिवसभर आरटीओ कार्यालयात आणि शहरात सुरू होती. या कारवाईनंतर तेथे काम करणाऱ्या अनेक एजंटांनी आरटीओ कार्यालयातून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे, या कारवाईची माहिती स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास नव्हती. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एआरटीओ माने आणि खासगी व्यक्तीला वेदांतनगर ठाण्यात नेले. तेथे मध्यरात्री चौकशीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला. सूत्रांनी सांगितले की, ड्रायव्हिंग स्कूलचालक यात तक्रारदार आहे. त्याने स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार न करता मुंबई एसीबीकडे तक्रार करून ही कारवाई घडवून आणली.