मापात पाप करून ग्राहक राजाच्या विश्वासाला तडा; ५२१ ठिकाणी तपासणी; ३१ लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:05 IST2025-05-02T11:57:46+5:302025-05-02T12:05:02+5:30
तपासणीत ४२४ प्रतिष्ठानांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ३० लाख ८० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल

मापात पाप करून ग्राहक राजाच्या विश्वासाला तडा; ५२१ ठिकाणी तपासणी; ३१ लाखांचा दंड वसूल
छत्रपती संभाजीनगर : ग्राहकाला ‘राजा’ मानले जाते, मात्र बाजारपेठेत काही व्यावसायिक राजाच्याच विश्वासाला तडा देत आहेत. कमी वजनाची उत्पादने देणे, एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणे, असे प्रकार वाढीस लागले आहेत. या प्रकारांवर लगाम घालण्यासाठी मागील आर्थिक वर्षात वैध मापनशास्त्र विभागाने मोठ्या प्रमाणावर कारवाई करत ३१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
५२१ व्यावसायिक ठिकाणी तपासणी
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत कार्यरत वैध मापनशास्त्र कार्यालयाने मागील आर्थिक वर्षात दुकान, हॉटेल, पेट्रोलपंप आदी ५२१ ठिकाणी तपासणी केली. या तपासणीत ४२४ प्रतिष्ठानांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ३० लाख ८० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पेट्रोलमध्येही फसवणूक; ३ पंपांवर कारवाई
लातूर येथील ३ पेट्रोलपंपांनी लिटरमागे २५ ते ३० टक्के कमी पेट्रोल व डिझेल दिल्याचे उघड झाले आहे. या पंपांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत.
तसेच, एमआरपीपेक्षा जास्त दराने पॅकबंद शीतपेय विकणाऱ्या छत्रपती संभाजीनगरातील २ दुकानदारांविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.
विविध कारणांवरून दंड
१) पॅकबंद वस्तूंवर उत्पादकाचा सविस्तर पत्ता नसणे.
२) उत्पादन दिनांक व मुदत संपण्याची तारीख नमूद न करणे.
३) मुदत संपलेली वजन-माप उपकरणे वापरणे.
या प्रकारांवरूनही संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे.
तक्रार करा, तुमचे नाव राहील गुप्त
व्यापाऱ्यांकडून वजन किंवा मापात फसवणूक होत असल्यास ग्राहकांनी वैध मापनशास्त्र यंत्रणेकडे तक्रार करावी. तक्रारीवर ७ दिवसांत कारवाई होऊन ग्राहकाला माहिती दिली जाईल. तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.