फुलंब्री : तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी येथे संपत्ती वाटपाच्या वादातून मुलाने बापाच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून, पोलिसांनी ९ तासांत या प्रकरणाचा छडा लावून आरोपी मुलाला अटक केली आहे.
तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी येथील परसराम अप्पा पवार हे पत्नीसह राहतात. त्यांना दोन मुले आहेत. दोघांचीही लग्न झाले असून ते वेगळे राहतात. परसराम यांच्याकडे दोन एकर शेती, ३० शेळ्या, दोन बैल आणि एक दुचाकी अशी संपती होती. संपत्तीचे वाटप करताना त्यांनी शेतीसह शेळ्यांचे वाटप केले. यानंतर दोन्ही बैल लहान मुलगा योगेशला दिले, तर दुचाकी मोठा मुलगा रोहिदासला दिली होती. यावर मला दुचाकी नको, तर दोन्ही बैल हवे, म्हणून रोहिदास हा परसराम यांच्यासोबत नेहमी वाद घालत होता. हाच वाद टोकाला जाऊन त्याने बापाच्या डोक्यात दगड घालून खून केला.
गणोरी फाट्यावर काढला काटापरसराम पवार यांचा मोठा मुलगा रोहिदास हा औरंगाबादेत एका खासगी कंपनीत रोजंदारीवर कामाला होता. पण, कोरोनामुळे कंपनी बंद पडल्याने तो गावातच राहात होता. बैल व मोटारसायकल वाटप करण्यावरून बापासोबत गुरुवारी सकाळी त्याचे जोरदार भांडण झाले. परसराम हे दुपारी चौका येथे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर रोहिदास चौक्याला गेला. तेथे त्याने रात्री वडील परसराम यांना दुचाकीवर बसवून गणोरी फाटा येथे आणले. तेथे रात्री १० वाजता पुन्हा वाद सुरू झाला. परसराम यांनी रोहिदास याला दोन थापड मारल्या. यामुळे रागाच्या भरात रोहिदासने दगड उचलून वडील परसराम यांच्या डोक्यात घातला. यात जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह तेथेच सोडून तो घरी निघून गेला व शेतात जाऊन झोपला.
पोलिसांना आली शंकाशुक्रवारी सकाळी परसराम यांचा खून झाल्याची बातमी मिळताच फुलंब्री पोलीस घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी मयताचे शव रुग्णवाहिकेत टाकण्यापूर्वीच रोहिदास हा रुग्णवाहिकेत जाऊन बसला, त्याचे घटनास्थळावरील वर्तन पाहून पोनि. अशोक मुद्दिराज यांना शंका आली. शव ग्रामीण रुग्णालयात ठेवल्यानंतर त्यांनी रोहिदासची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने खून केल्याची कबुली देत सर्व घटनाक्रम सांगितला. याप्रकरणी लहान भाऊ योगेश पवार यांच्या तक्रारीवरून रोहिदास पवार याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक केली आहे.