बोगस नोकरीचे आमिष

By Admin | Updated: May 11, 2014 00:10 IST2014-05-11T00:02:29+5:302014-05-11T00:10:22+5:30

अशोक कारके , औरंगाबाद भारतीय वन विभागात क्षेत्रीय अधिकारी पदावर नियुक्ती केल्याचे पत्र शहरातील १० ते १२ तरुणांना नवी दिल्ली येथून आले आहे़

Bogus job bait | बोगस नोकरीचे आमिष

बोगस नोकरीचे आमिष

 अशोक कारके , औरंगाबाद भारतीय वन विभागात क्षेत्रीय अधिकारी पदावर नियुक्ती केल्याचे पत्र शहरातील १० ते १२ तरुणांना नवी दिल्ली येथून आले आहे़ प्रशिक्षणादरम्यान सुरक्षा रक्कम म्हणून बँक खात्यावर १३ हजार ३०० रुपये जमा करा, असे सांगून नोकरीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे़ विशेष म्हणजे भारतीय वन विभागाच्या नावाने कोणताही अर्ज न भरलेल्या तरुणांना असे बनावट नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे. तरुणांना गंडविण्यासाठी उमेदवाराची निवड फक्त फोनद्वारे केली जाईल, अशी सूचना पत्रात देण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकारी पदावर नियुक्ती केल्यानंतर २५ हजार ५०० रुपये महिना पगार, राहण्यासाठी घर, चारचाकी वाहन व त्यावर चालक, ५ लाखाचा भारत सरकारद्वारा विमा, वर्षाला १० टक्के वेतनवाढ, वन मंत्रालयाकडून व्हीआयपी नंबर, महिन्यात तीन वेळा विमान प्रवासाची संधी, असे आमिष दाखविण्यात आले आहे. यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये आशिषकुमार या नावाने असणार्‍या ३३७२५५०४८६३ या क्रमांकाच्या खात्यावर १३ हजार ३०० रुपये जमा करण्यास सांगितले आहे. यानंतर विभागाचा अधिकारी येऊन उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करून दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी प्रवेशपत्र व व्ही़ आय़ पी़ बॅच नंबर देईल़ उमेदवाराने पैसे भरल्यानंतर दोन दिवस प्रतीक्षा करावी, असे सुचविले आहे़ या नियुक्तीपत्रामुळे तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नियुक्तीपत्र कुणी पाठविले याचा ठावठिकाणा लागत नाही. ना परीक्षा ना मुलाखत उमेदवाराची कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात आलेली नाही़ यापैकी काहींनी वन विभागाचा कोणताही अर्ज भरलेला नाही़, तरीही या तरुणांना नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे. युवराज दादाराव पदार या तरुणाला ५ मे रोजी पत्र मिळाले आहे़ त्याने वन विभागाला संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने लोेकमत प्रतिनिधीशी संपर्क साधला़ वन विभागाला गांभीर्य नाही मागील काही दिवसांत वन विभागाकडे तरुणांनी बोगस नियुक्तीपत्र मिळाल्याच्या तोंडी तक्रारी केल्या आहेत़ मात्र, याची दखल अद्यापही विभागाने घेतलेली नाही़ यामुळे बोगस नियुक्तीपत्र पाठविणार्‍या परप्रांतीय टोळीने अनेक तरुणांना फसविले असण्याची शक्यता आहे़ वन विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा अनेकांना फटका यापुढेही बसणार आहे़ वन विभागाने याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ वन अधिकारी म्हणतात फाडून फेका वन विभागाचे आलेले पत्र घेऊन मी वन विभागाशी संपर्क साधला असता वन अधिकार्‍यांनी सांगितले आमचा आणि भारतीय वन विभागाचा काहीच संबंध नाही़ हे बोगस नियुक्तीपत्र आहे, ते फाडून फेका असे सांगितले़ आमच्याकडे आतापर्यंत १० ते १२ जणांनी अशाच प्रकारच्या तोंडी तक्रारी केल्या असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. -युवराज पदार, नियुक्तीपत्र आलेला तरुण टोळ्यांचा बंदोबस्त करावा सरकारी नोकरी मिळत नाही़ म्हणून अनेक तरुण अशा बोगस नियुक्तीपत्राला बळी पडतात़ नोकरीच्या आशेने खात्यावर पैसे जमा करतात़ बोगस कारभार करणार्‍या टोळ्यांचा बंदोबस्त संबंधित विभागाने पोलिसात तक्रार करून केला पाहिजे़ - सोहम राठोड, नियुक्तीपत्र आलेला तरुण भारतीय वन विभागाच्या नावाने पाठविलेले नियुक्तीपत्र वन विभागाचे नाही़ वन विभागात क्षेत्रीय अधिकारी नावाचे पद नाही़ क्षेत्रीय अधिकारी पदावर नियुक्त केल्याचे पाठविलेले पत्र बोगस आहे़ शहरातील काही तरुणांनी कार्यालयाकडे असे पत्र आल्याचे तोंडी कळविले आहे़ मात्र, एकानेही लेखी तक्रार केलेली नाही़ उमेदवाराने लेखी तक्रार केल्यास पुढील कारवाई केली जाईल़ - आऱ आऱ मळेकरी, सहायक वनसंरक्षक

Web Title: Bogus job bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.