अमेरिकन नागरिकांना फसविणारे बोगस कॉल सेंटर; आरोपींच्या चार मजली इमारतीची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:51 IST2025-11-01T12:49:43+5:302025-11-01T12:51:40+5:30
दहापेक्षा अधिक लॅपटॉप, क्रेडिट कार्डसह घोटाळ्यासंदर्भात कागदपत्रे जप्त

अमेरिकन नागरिकांना फसविणारे बोगस कॉल सेंटर; आरोपींच्या चार मजली इमारतीची झाडाझडती
छत्रपती संभाजीनगर : विदेशी नागरिकांना विविध प्रकारे जाळ्यात अडकवून कोट्यवधी रुपयांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या कॉल सेंटरच्या चालक व कर्मचाऱ्यांच्या चार मजली इमारतीची पोलिसांनी शुक्रवारी कसून तपासणी केली. जवळपास तीन तास चाललेल्या झाडाझडतीत दहापेक्षा अधिक लॅपटॉप, क्रेडिट कार्ड व घोटाळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बनावट शासकीय कागदपत्रांचे गठ्ठे सापडल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
२८ ऑक्टोबर रोजी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील आयटी पार्कमध्ये आयआरएस इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट नावाच्या सायबर गुन्हेगारांचे कॉल सेंटर उघडकीस आले. शहरातून विदेशातील नागरिकांना त्यांच्या कर व बँक व्यवहारांच्या माहितीच्या आधारे कोट्यवधी रुपयांना गंडा घातला जात होता. यात आतापर्यंत भावेश प्रकाश चौधरी (३४), भाविक शिवदेव पटेल (२७), सतीश शंकर लाडे (३५), वलय पराग व्यास (३३), (सर्व रा. अहमदाबाद, गुजरात), अजय ठाकूर आणि मनवर्धन राठोडसह रॅकेटचा महाराष्ट्रातील मास्टरमाइंड अब्दुल फारुक मुकदम शाह ऊर्फ फारुकी याला अटक करण्यात आली. शुक्रवारी या सर्वांना एकमेकांसमोर बसवून पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, निरीक्षक गीता बागवडे यांनी कसून चौकशी केली.
सिंधी कॉलनीतील बंगला क्र. ५६
सहा प्रमुख आरोपींसह ११४ कर्मचाऱ्यांसाठी फारुकने सिंधी कॉलनीतील बंगला क्र. ५६ किरायाने घेतला होता. सर्व आरोपींची राहण्याची तेथे व्यवस्था होती. तरुण-तरुणी एकत्र राहत होते. मात्र, त्यांना दिवसभर बाहेर कुठेही जाण्याची अनुमती नव्हती. शिवाय, पगाराव्यतिरिक्त त्यांचा सर्व खर्च फारुक करत होता. पोलिसांनी शुकवारी दुपारी तीन तास या इमारतीची झाडाझडती घेतली. त्यात अनेक विदेशी कागदपत्रे हाती लागली. पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. अटकेतील सात आरोपींच्या चौकशीनंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या काही आरोपींना पुन्हा ताब्यात घेऊन रॅकेट कसे चालायचे, त्यांना प्रशिक्षण कोणी दिले इ. माहिती घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.