विद्यापीठातील विहिरीत आढळला मृतदेह; ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:09 IST2025-11-03T13:08:49+5:302025-11-03T13:09:31+5:30
विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोरील रस्त्यापासून ५० फूट अंतरावरील झाडाच्या खाली एक अर्धी बुजलेली विहीर आहे.

विद्यापीठातील विहिरीत आढळला मृतदेह; ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीच्या शेजारील पार्किंगजवळील विहिरीत एका पुरुषाचा मृतदेह रविवारी सकाळी आढळला. मृतदेहाला बेगमपुरा पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने बाहेर काढले. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.
विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोरील रस्त्यापासून ५० फूट अंतरावरील झाडाच्या खाली एक अर्धी बुजलेली विहीर आहे. या विहिरीतून सकाळी प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. तेव्हा मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी सुरक्षा रक्षकांना सांगितले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाहिल्यानंतर विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला. पोलिस आल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. उप अग्निशमन अधिकारी विजय राठोड, ड्यूटी ऑफिसर दीपराज गंगावणे, जवान संग्राम मोरे, प्रसाद शिंदे, प्रणाल सूर्यवंशी, मनसुब सपकाळ, विक्रांत बकले, लव घुगे आदींनी शव काढल्यानंतर ते घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले.
मृतदेहावर व्रण नसल्याची पोलिसांची माहिती
शव दोन दिवसांपासून विहिरीत पडून असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे. दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मृतदेहाची तपासणी केल्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकारचे व्रण, खुना आढळून आलेल्या नाहीत. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार असल्याचेही पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी स्पष्ट केले.
असुरक्षीत विहिरी
विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विहिरी आहेत. त्यातील मोजक्याच विहिरींचा वापर करण्यात येतो. उर्वरित विहिरीची डागडुजी करून त्या वापरात आणण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी यासाठी बराच पाठपुरावा केला होता. मात्र, दोन विहिरींच्या पुढे दुरुस्ती सरकली नाही.