औरंगाबादमध्ये लेखापरीक्षकाची राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 12:31 PM2017-11-17T12:31:17+5:302017-11-17T12:31:39+5:30
जालना जिल्हा परिषदेतील विशेष लेखापरीक्षक सुधाकर अभिमन्यू मुंडे यांनी राहत्या घरी डोक्यात रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
औरंगाबाद : जालना जिल्हा परिषदेतील विशेष लेखापरीक्षक सुधाकर अभिमन्यू मुंडे यांनी राहत्या घरी डोक्यात रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. शिवाजी नगर येथे मुंडे यांच्या राहत्या घरी घडलेल्या या घटनेने या भागात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सुधाकर मुंडे यांच्या विरोधात परभणी येथे ३०७ कलम अंतर्गत गुन्हा दाखल होता अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच एसीपी रामेश्वर थोरात, डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्यासह पुंडलीकनगर पोलिसांनी पाहणी केली आहे. पाहणीनंतर मृतदेह शासकीय रुग्णालय घाटी येथे पाठवला आहे.
याबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि, मुंडे यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील वडवणी असून ते नोकरीनिमित्त औरंगाबादेत राहत होते. त्यांना दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. सकाळी मुंडे त्यांच्या राहत्या घरी खुर्चीवर बसलेले असताना त्यांनी डोक्यात मागील बाजूने गोळी झाडली व आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.