रक्त सांडू; पण गंगापूर सहकारी कारखान्याची विक्री होऊ देणार नाही : कृष्णा पाटील-डोणगावकर यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 19:09 IST2021-03-02T19:08:38+5:302021-03-02T19:09:27+5:30
हा कारखाना लिलावात काढण्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कृष्णा पा. डोणगावकर, मनसेचे दिलीप पाटील बनकर, प्रहार संघटनेचे भाऊसाहेब पाटील-शेळके व कारखान्यातील कामगार युनियनचे नेते विठ्ठल गुंज यांनी ही पत्रकार परिषद घेतली.

रक्त सांडू; पण गंगापूर सहकारी कारखान्याची विक्री होऊ देणार नाही : कृष्णा पाटील-डोणगावकर यांचा इशारा
औरंगाबाद : रक्त सांडू; पण गंगापूर सहकारी साखर कारखान्याची विक्री होऊ देणार नाही, असा इशारा सोमवारी (दि. १) येथे पत्रकार परिषदेत कृष्णा पाटील डोणगावकर यांनी दिला.
हा कारखाना लिलावात काढण्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कृष्णा पा. डोणगावकर, मनसेचे दिलीप पाटील बनकर, प्रहार संघटनेचे भाऊसाहेब पाटील-शेळके व कारखान्यातील कामगार युनियनचे नेते विठ्ठल गुंज यांनी ही पत्रकार परिषद घेतली. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ त्वरित बरखास्त करण्याची मागणी यावेळी या सर्वांनी केली. अन्य मागण्या अशा : गंगापूर सहकारी साखर कारखाना प्रकरणातील १५ कोटी ७५ लाख रुपये कथित अपहारप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होऊन नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे; परंतु अद्यापपर्यंत एकाही आरोपीला अटक झाली नाही, ती करण्यात यावी. आरोपींकडून १५ कोटी ७५ लाख रुपये जप्त करून कारखान्याच्या खात्यात वर्ग करण्यात यावेत. सहकार कलमाखालील चौकशी तत्काळ करण्यात यावी, कारखान्याचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे.
या प्रकरणात आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप कृष्णा पाटील-डोणगावकर यांनी केला. कारखान्यातील ६०० कामगारांचे सुमारे १८ कोटी रुपयांचे वेतन थकलेले आहे. यासाठी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे गुंज यांनी सांगितले.