ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:46 IST2025-07-25T17:45:45+5:302025-07-25T17:46:50+5:30
दौलताबाद घाटात भीषण प्रकार; प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, नंतर स्वत: गेला पोलिसांकडे

ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
शिऊर (छत्रपती संभाजीनगर): पैशाची मागणी आणि खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने संतप्त प्रियकराने प्रेयसीचा डोकं दगडावर आपटून निर्घृण खून केला. मृतदेह दौलताबाद घाटात फेकून आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. गुरुवारी (२४ जुलै) रात्री ही थरकाप उडवणारी घटना घडली असून, शुक्रवारी सकाळी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
दिपाली गणेश आस्वार (वय १९, रा. माळीवाडा, ता. कन्नड) असे मृत युवतीचे नाव असून, ती सध्या कन्नड येथे बहिणीकडे राहत होती. मांडकी (ता. वैजापूर) येथील सुनील सुरेश खंडागळे (वय २१) याच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून तिचे प्रेमसंबंध होते. गुरुवारी सुनीलने वडिलांची दुचाकी घेऊन कन्नड गाठले आणि दिपालीला भेटले. दिवसभर ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरले. संध्याकाळनंतर ते दौलताबाद घाटात गेले. तेथे दोघांमध्ये तीव्र वाद झाला. वादाचे मूळ कारण म्हणजे दिपालीने एक लाख रुपये मागितले आणि पैसे न दिल्यास "बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन," अशी धमकी दिली. या प्रकाराने संतप्त झालेला सुनील नियंत्रण हरपून गेला. रागाच्या भरात त्याने दिपालीचे डोके दगडावर आपटून तिचा जागीच खून केला. नंतर मृतदेह घाटात ढकलून देऊन तो घटनास्थळावरून निघून गेला.
थेट पोलिसांत जाऊन कबुली
घटनेनंतर काही तासांतच सुनीलने थेट शिऊर पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखंब यांनी तत्काळ दौलताबाद पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शोधून काढला. पोलीस तपासात मृतदेहाची ओळख दिपाली आस्वार हिच्या रूपात पटली. आरोपी सुनील खंडागळेला ताब्यात घेऊन त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौलताबाद पोलीस करत आहेत.