भाजपची स्वबळाची भाषा, मात्र सर्व्हेवर अपेक्षा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:30 IST2025-10-17T14:25:26+5:302025-10-17T14:30:02+5:30
छत्रपती संभाजीनगर : भारतीय जनता पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढाव्यात, अशी मागणी नेते, पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र ...

भाजपची स्वबळाची भाषा, मात्र सर्व्हेवर अपेक्षा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून आढावा
छत्रपती संभाजीनगर : भारतीय जनता पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढाव्यात, अशी मागणी नेते, पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १० ऑक्टोबर रोजी केल्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडून पक्ष सद्य:स्थितीचा आढावा घेतला. सर्वांची स्वबळाची भाषा असली तरी सर्व्हेअंतीच ती अपेक्षा पूर्ण होणार आहे.
मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात पक्षस्थिती काय? हे जाणून घेताना प्रथमत: छत्रपती संभाजीनगर शहरातील २९ पैकी १३ प्रभागांत भारतीय जनता पक्ष अ श्रेणीमध्ये असल्याचे पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. खोटे आकडे दाखवून फसवणूक करू नका, आमचाही वेगळा सर्व्हे सुरू आहे. त्यामुळे कुठे पक्षाची काय परिस्थिती, हे आम्हालाही चांगलेच ठाऊक आहे, असे चव्हाण यांनी बैठकीत सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये पाच तास चिंतन बैठक घेतल्यानंतर गुरुवार, दि.१६ ऑक्टोबर रोजी चव्हाण यांनी पुन्हा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी नेमून दिलेल्या कामांचा पाठपुरावा म्हणून सिडकोतील एका हॉटेलमध्ये चार तास बैठक घेतली. बैठकीला ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, पदवीधर मतदारसंघप्रमुख आ. संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे, रामूकाका शेळके आदींची उपस्थिती होती.
गटबाजी मिटविण्यासाठी वरूनच फर्मान...
पक्षातील अंतर्गत कुरबुरी, गटबाजी मिटविण्यासाठी संघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मंत्र्यांसह नेत्यांनाही समज दिली आहे. पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचे मूल्यांकन सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी मंत्र्यांना समजावले आहे. निवडणुकीसाठी मंत्र्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे. पुढील दोन महिने पूर्णत: पक्षाला द्या, इच्छुक खूप आहेत. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी मोर्चेबांधणी करा, अशा पद्धतीने पक्षपातळीवर सूचना करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.