वक्फ बोर्डाची जमीन अदानी, अंबानीला देण्याचा भाजपचा डाव; अंबादास दानवेंचा आरोप
By बापू सोळुंके | Updated: April 3, 2025 19:46 IST2025-04-03T19:46:03+5:302025-04-03T19:46:51+5:30
'शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते, मात्र अर्थमंत्री अजित पवार स्पष्टपणे कर्जमाफी नाकारत आहेत.

वक्फ बोर्डाची जमीन अदानी, अंबानीला देण्याचा भाजपचा डाव; अंबादास दानवेंचा आरोप
छत्रपती संभाजी नगर: वक्फ बोर्डाची जमीन अदानी आणि अंबानीला देण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. केंद्र सरकारने बुधवारी रात्री उशिरा वक्फ दुरूस्ती विधेयकला मंजुरी दिल्यासंबंधी विचारल्यावर आ.दानवे यांनी उपरोक्त उत्तर दिले.
छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेल्या आ.दानवे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. आज मात्र उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीतदादा पवार हे स्पष्टपणे कर्जमाफी नाकरत आहे, ते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे आ.दानवे यांनी नमूद केले.
बीड मध्ये गुंडगिरी खपवून घेणार नाही,असे उपमुख्यमंत्री अजीतदादा यांनी सांगितले. याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, बीड मध्ये गुन्हेगारी का वाढली आहे. गुन्हेगारांना सरंक्षण देणारे तेथील राजकारणी लोकं आहे. बीड मध्येच गुन्हेगारी का वाढली यांची दखल पंकजा मुंडे यांनी घेतली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.
चंद्रकांत खैरे ज्येष्ठ आहेत
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या आरोपाविषयी विचारले असता आ.दानवे म्हणाले की,खैरे साहेब ज्येष्ठ आहेत. अशात कोणता कार्यक्रम आपण घेतला नाही.आठवडा, पंधरा दिवसाला त्यांच्याकडे जात असतो, असे सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ऑगस्ट पर्यंत आपण विरोधी पक्षनेतेपदी असलो तरीही शिवसेना नेतेपदी पुढेही असेल.यामुळे आपल्याला थांबू शकत नसल्याचे नमूद केले.