ना शिंदे ना ठाकरे सेनेसोबत युती; भाजप महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:41 IST2025-01-08T16:41:15+5:302025-01-08T16:41:46+5:30

‘युती होणार, ठाकरे गटाशीही जुळवून घेणार‘, यासारख्या चर्चेमुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

BJP will contest the municipal elections on its own; No alliance with Shinde, no connection with the Thackeray group | ना शिंदे ना ठाकरे सेनेसोबत युती; भाजप महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार

ना शिंदे ना ठाकरे सेनेसोबत युती; भाजप महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेची युती होणार, असे शिंदेसेनेचे नेते ठामपणे सांगत असले तरी शिंदेसेनेशी युती होणार नाही, असे भाजपने मंगळवारी स्पष्ट केले.

मुंबईतील प्रदेश कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपचा महापौर बसविण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या. भाजपची शहरामध्ये ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. येणाऱ्या काळात विविध पक्षांतील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा यावेळी स्थानिक नेत्यांनी केला.

दरम्यान आ. रवींद्र चव्हाण, आ. चंद्रशेखर गरजे, राज्यसभा खा. डॉ. भागवत कराड, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या उपस्थितीत रिपाइंचे माजी नगरसेवक कैलास गायकवाड, रमेश जायभाय यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप कार्यकर्ते अस्वस्थ...
‘युती होणार, ठाकरे गटाशीही जुळवून घेणार‘, यासारख्या चर्चेमुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. २०१९ पासून आजपर्यंत कार्यकर्त्यांनी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी सामना केला. शिंदेसेना सोबत आल्यानंतर सत्ता मिळाली, पण त्यात कार्यकर्त्यांचे काही भले झाले नाही. मंत्री, नेत्यांच्या मागे-मागे फिरणाऱ्यांचे अडीच वर्षांत कल्याण झाले. राष्ट्रवादीचा एक गट महायुतीत आल्यानंतरही कार्यकर्त्यांचे मनोबल खचले. आता सत्ता आल्यामुळे काही भले होईल, या अपेक्षेत कार्यकर्ते असतानाच ठाकरेंशी हातमिळवणीची चर्चा, नवीन पक्षप्रवेशांमुळे ते पुन्हा खचले आहेत. पक्ष प्रत्येक कार्यक्रम ‘टार्गेट’ देऊन पूर्ण करून घेतो, मात्र त्या तुलनेत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना ‘आउटपूट’ मिळत नसल्याची भावना अनेकांनी बोलवून दाखविली.

मनपात एकहाती सत्ता आणू
येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपला स्वबळावर लढायच्या आहेत. मनपा निवडणूक स्वबळावर लढविणार असून, एक नंबरचा पक्ष म्हणून सगळ्यात जास्त नगरसेवक भाजप निवडून आणेल, त्यासाठी नियोजन सुरू आहे. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेला नगरसेवकच महापौर बनेल. मनपात एकहाती सत्ता आणणार आहोत. कुणाशीही आमची युती होणार नाही. शिंदेंसोबत युती होणार नाहीच, शिवाय ठाकरे गटाशी तर संबंधच राहिलेला नाही. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
- शिरीष बोराळकर, भाजप शहराध्यक्ष

Web Title: BJP will contest the municipal elections on its own; No alliance with Shinde, no connection with the Thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.