सोयगावात भाजपला खिंडार, सहापैकी चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:34 IST2022-02-02T11:33:36+5:302022-02-02T11:34:40+5:30
भाजपचे चार नवनिर्वाचित नगरसेवक शिवसेनेत गेले असतील तर त्यांच्यावर पक्षीय कारवाई केली जाईल. - इद्रीस मुलतानी, प्रदेश सरचिटणीस, भाजपा.

सोयगावात भाजपला खिंडार, सहापैकी चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
सोयगाव : नगरपंचायत निवडणुकीत बहुमतापासून दूर ठेवलेल्या भाजपाला शिवसेनेने मंगळवारी पुन्हा इंगा दाखविला आहे. भाजपच्या निवडून आलेल्या सहा सदस्यांपैकी चार जणांना सोबत घेऊन शिवसेनेने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. गटनेता निवडीच्या प्रशासकीय प्रक्रियेत भाजप नगरसेवकांना सहभागी करून घेत त्यांचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचे सिद्ध झाले. निवडणुकीच्या पराभवानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धक्का दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
सोयगाव नगरपंचायत निवडणुकीनंतर भाजपाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. नगराध्यक्षपदाच्या निवडीच्या तोंडावर भाजपच्या नगरसेविका वर्षा घनगाव, ममताबाई इंगळे, आशियाना शाह, नगरसेवक संदीप सुरडकर या चार जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी हजेरी लावल्याने शिवसेनेच्या गोटात गेल्याचे सिद्ध केले. त्यामुळे सोयगावच्या राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चा रंगली होती. मागील पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेला नगराध्यक्ष पदाच्या पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचा वचपा या निवडणुकीत शिवसेनेकडून काढला जात असल्याची चर्चा सुरू होती.
नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची सोडत जाहीर झालेली आहे. अनुसूचित जमाती महिला गटाकडे नगराध्यक्षपद राखीव झालेले असून शिवसेनेकडे बहुमत आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवारदेखील आहे. परंतु नगरपंचायत निवडणुकीचे गेमचेंजर असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा भाजपला धडा शिकविण्यासाठी हा राजकीय डावपेच आखला आहे. या डावपेचाने मात्र भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरलेली आहे.
नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून तडवींचा अर्ज
नगरपंचायतीच्या सभागृहात भाजपाकडे सहा नगरसेवक संख्या असताना त्यातून चार नगरसेवकांनी शिवसेनेचा तंबू गाठल्याने आता भाजपाकडे दोनच नगरसेवक आहेत. मंगळवारी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत होती. शिवसेनेकडून बहुमताच्या जोरावर अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवार आशाबी अश्रफ तडवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. सूचक अन् अनुमोदकही उरला नसल्याची नामुष्की भाजपवर आली आहे. ७ फेब्रुवारीला नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. त्यामुळे आशाबी तडवी नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याच म्हणाव्या लागतील. ७ फेब्रुवारीच्या सभेत फक्त अधिकृत घोषणा उरली आहे.