महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही भाजपचाच 'धुरंधर'; शिंदेसेनेची जिल्ह्यात मोठी पीछेहाट
By विकास राऊत | Updated: March 19, 2026 14:48 IST2026-03-19T14:47:45+5:302026-03-19T14:48:55+5:30
एक खासदार, अर्धा डझन आमदार असतानाही शिंदेसेनेची पीछेहाट; खासदार, अर्धा डझन आमदार असूनही शिंदेसेनेला जिल्हा परिषदेत भाजपचा 'चेकमेट'

महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही भाजपचाच 'धुरंधर'; शिंदेसेनेची जिल्ह्यात मोठी पीछेहाट
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेची युती तुटल्यानंतर भाजपने ५७ जागा जिंकत विक्रम केला. त्यानंतर नऊपैकी सहा पंचायत समित्या व बुधवारी जिल्हा परिषदेवरही झेंडा फडकाविला. ‘धुरंधर’ राजकारण करीत भाजपने शिंदेसेनेला शह दिला असून, याचे पडसाद आगामी काळात कसे उमटतील, याकडे लक्ष लागले आहे. शिंदेसेना-भाजपच्या युतीमध्ये बुधवारी मिठाचा खडा पडला असून, आगामी काळात याचे पडसाद मनपा आणि जि. प.सह इतर स्थानिक संस्थांच्या राजकारणात उमटतील.
जि. प., पं. स. निवडणुकीत युती कागदावर असतानाही प्रत्यक्षात भाजप-शिंदेसेना उमेदवार काही गट-गणांत एकमेकांच्या विरोधात लढल्याने कुणालाही बहुमत मिळाले नाही. जि. प. अध्यक्षपदासाठी ३२ हा बहुमताचा जादुई आकडा गाठणे भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार)ला एकमेकांच्या सोबतीविना अशक्य होते. परंतु, यात शिंदेसेनेला पहिल्या अडीच वर्षांत अध्यक्षपद हवे होते. त्यामुळे भाजपने पूर्ण ताकदीने गोळाबेरीज करीत जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षपद ताब्यात घेतले. एक खासदार, अर्धा डझन आमदार असतानाही शिंदेसेनेची जिल्ह्यात पीछेहाट सुरू झाल्याचे यातून दिसते.
आधी शिंदेसेनेचा अध्यक्ष करायचे ठरले होते. परंतु, भाजपने ऐन वेळी धोका दिल्याचा शिंदेसेनेचा आरोप आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेनुसार तो निर्णय झाला होता. दोन समित्या वाटून घेण्याचे ठरले होते. भाजपने शिंदेसेनेच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरल्यामुळे जि. प.मध्ये उपाध्यक्षपद व भाजपचे सहकार्य नको, अशी भूमिका घेत शिंदेसेनेने निवडणूक प्रकियेवरच बहिष्कार टाकला. शिंदेसेनेकडे २१ सह तीन पुरस्कृत मिळून २४ सदस्य होते. त्यामुळे बहुमत आमचे आहे, असा दावा शिंदेसेनेकडून केला जात होता. ३४ सदस्य शेवटच्या क्षणापर्यंत होते. परंतु, ऐन वेळी सगळी फाटाफूट झाली. २२ सदस्यच शिंदेसेनेकडे राहिले. ३२ सदस्य भाजपकडे आल्याने बिनविराेध विजयी होण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला.
भाजपची दबावतंत्राची रणनीती
एक खासदार, अर्धा डझन आमदार असताना शिंदेसेनेच्या हातून मनपा, जि. प., पं. समित्यांसारखी राजकीय सत्ताकेंद्रे निसटली. भाजपच्या दबावतंत्राच्या रणनीतीपुढे शिंदेसेनेला काहीही करता आले नाही. शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजीही या सगळ्या बाबींना कारणीभूत ठरली आहे. जमेल त्या पद्धतीने भाजप सत्ताकेंद्र काबीज करीत जिल्ह्यात पक्षाची पकड मजबूत करीत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आतापासूनच काम करीत असल्याचे दिसते आहे.