एमआयएमच्या सय्यद मतीन यांना मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 16:45 IST2018-08-20T16:35:57+5:302018-08-20T16:45:28+5:30
माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावास विरोध केल्याने एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना सभागृहातच बेदम मारहाण करण्यात आली होती.

एमआयएमच्या सय्यद मतीन यांना मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकांना अटक
औरंगाबाद : माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावास विरोध केल्याने एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना सभागृहातच बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी आज दुपारी मारहाण करणाऱ्या भाजपच्या ५ नगरसेवकांना पोलिसांनी अटक केली आहे. उपमहापौर विजय औताडे यांच्या तक्रारीवरून मतीन यांना शनिवारीच (दि. १८) अटक करण्यात आलेली आहे.
शुक्रवारी (दि.१७ ) एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी महानगरपालिकेच्या विशेष सभेत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावास विरोध करत वादग्रस्त व्यक्तव्य केले. यामुळे सभागृहात अभूपूर्व गोंधळ होत भाजप सदस्यांनी मतीन यांना बेदम मारहाण केली होती. या विरोधात मतीन यांनी मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावरून आज दुपारी मतीन यांना मारहाण करणारे भाजपचे उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक प्रमोद राठोड, राज वानखेडे, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे यांना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, या प्रकरणी शनिवारी (दि.१८ ) उपमहापौर विजय औताडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सय्यद मतीन यांना अटक करण्यात आली आहे. औताडे यांनी तक्रारीत नमूद केले की, १७ ऑगस्ट रोजी महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. त्यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ठराव मांडून श्रद्धांजली वाहण्यात आली. सदस्यांची श्रद्धांजलीपर भाषणे चालू असताना एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन रशीद हा सभागृहामध्ये उभा राहिला आणि ओरडून दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलत होता. यावरून सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर तो सभागृहाबाहेर गेला आणि तेथे उभ्या असलेल्या लोकांना चिथावणी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.