औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अतुल सावे हे लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या उल्लंघनामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. सावे यांनी एकाच मतदारसंघात दोनदा नावनोंदणी केलेली असून, त्यांच्याकडे दोन मतदान ओळखपत्रेही आहेत, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल झाली आहे. अतुल सावे हे औरंगाबाद मध्य मतदारसंघातील मतदार आहेत. याच मतदारसंघात त्यांचे नाव दोन वेळेस नोंदलेले आहे; पण त्यांनी एकीकडील नाव रद्द करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज केलेला नाही. त्यामुळे सावे यांनी लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० चे उल्लंघन केले आहे. या कायद्यातील कलम १७ आणि १८ नुसार एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार नोंदणी करणे, एकापेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये नोंदणी करणे हा गुन्हा आहे. कलम ३१ नुसार हा गुन्हा शिक्षापात्र आहे. त्यामुळे अतुल सावे यांच्याविरुद्ध या कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी सुधाकर बाजीराव भोळे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केली आहे. या तक्रारीसोबत सावे यांच्या दोन्ही मतदान ओळखपत्रांच्या छायांकित प्रतीही सादर केल्या आहेत.
भाजपा उमेदवार अतुल सावे अडचणीत
By admin | Updated: October 14, 2014 00:41 IST