भरधाव पीकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; चालक वाहन सोडून फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 19:08 IST2024-01-25T19:06:43+5:302024-01-25T19:08:23+5:30
धडकेनंतर खाली पडलेल्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून पीकअपचे चाक गेले

भरधाव पीकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; चालक वाहन सोडून फरार
सिल्लोड: तालुक्यातील वांगी फाट्यावर आज दुपारी १२. ३० वाजेच्या दरम्यान भरधाव जाणाऱ्या पिकअप व्हॅनने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दिगंबर रामराव काकडे ( ४१ रा.धानोरा ता.सिल्लोड) असे मृताचे नाव आहे.
आज दुपारी दिगंबर रामराव काकडे हे दुचाकीवरून ( क्र. एम एच २० ए झेड ६४५५ ) भराडी कडे जात होते. तर भराडीकडून एक पिकअप व्हॅन ( क्र. एम एच ०४ एफ डी ९५६६ ) सिल्लोडकडे येत होती. वांगी फाट्यावर भरधाव पिकअप व्हॅनने समोरून येणाऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरून खाली पडलेल्या काकडे यांच्या डोक्यावरून पीकअप व्हॅनचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर व्हॅन चालक घटनास्थळावरून वाहनसोडून फरार झाला. प्रकाश रामराव काकडे यांच्या तक्रारीवरुन सिल्लोड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जमादार यतीन कुलकर्णी करीत आहेत.