मोठी बातमी: मोबाइलवर फोटो काढून चालान दिल्यास आता 'खाकी'वरच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:53 IST2025-07-09T13:52:16+5:302025-07-09T13:53:13+5:30

राज्याच्या वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांचा आदेश : तीन वेळा परिपत्रक, तरीही वाहतूक पोलिसांकडून नियमभंग

Big news: Now action will be taken against 'Khaki' if a challan is issued by taking a photo on a mobile phone | मोठी बातमी: मोबाइलवर फोटो काढून चालान दिल्यास आता 'खाकी'वरच कारवाई

मोठी बातमी: मोबाइलवर फोटो काढून चालान दिल्यास आता 'खाकी'वरच कारवाई

- सुमित डोळे

छत्रपती संभाजीनगर : नियम मोडणाऱ्या वाहनाचे खाजगी मोबाइलद्वारे छायाचित्र काढून चालान फाडल्यास आता वाहतूक पोलिसांवरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी नुकतेच याबाबतचे परिपत्रक जारी केले.

२०१५-१६ मध्ये राज्यात पहिल्यांदा ऑनलाइन चालान प्रणालीला सुरुवात झाली. मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर २०१९ मध्ये राज्यभरात ई-चालान यंत्राद्वारे ऑनलाइन दंड, चालान सुरू करण्यात आले. वाहतूक पोलिसांवर सातत्याने होणाऱ्या लाचखोरीच्या आरोपांपासून वाचण्यासाठी या प्रणालीला महत्त्व प्राप्त झाले. या चालान प्रक्रियेसाठी शासनाने दिलेल्या ई-चालान मशीनद्वारेच छायाचित्र काढणे अपेक्षित होते. मात्र, अनेक वाहतूक अधिकारी, अंमलदार स्वतःच्या मोबाइलमध्ये नियम मोडणाऱ्या वाहनचालकाचे छायाचित्र काढून सोयीनुसार ई-चालान मशीनमध्ये अपलोड करून दंड ठरवतात. विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी परिवहनमंत्र्यांसोबतच्या मुंबईतील बैठकीत यावर तीव्र आक्षेप नोंदवला.

काय म्हटले आहे परिपत्रकात?
या बैठकीनंतर राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी राज्यभरातील वाहतूक पोलिसांसाठी परिपत्रक जारी केले. त्यातील आदेशानुसार :
-वाहतुकीचे नियमन करताना अधिकारी, अंमलदार खाजगी मोबाइलद्वारे एकाच वेळी मोठ्या संख्येने छायाचित्रे काढून सोयीनुसार चालान पाठवितात.
-अशा प्रकारे मोबाइलद्वारे छायाचित्र काढून ई-चालान केल्यास पोलिस अधिकारी, अंमलदारांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
-वाहतूक पोलिसांनी यासाठी केवळ ई-चालानचाच वापर करावा, अशी कडक सूचना या परिपत्रकानंतर वाहतूक पोलिसांना करण्यात आली आहे.

मेगापिक्सेलची अडचण
यापूर्वी मोबाइलद्वारे छायाचित्र काढून दंड आकारण्यावर आक्षेप नोंदवले गेले होते. खंडपीठातदेखील याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. अपर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून दोन वेळा अशाच प्रकारे परिपत्रक जारी झाले. मात्र, वाहतूक पोलिसांकडून मोबाइलद्वारेच छायाचित्र काढून ई-चालान मशीनवर अपलोड करून नंतर दंड आकारण्यात येतो. ई-चालान मशीनचे मेगापिक्सेलच कमी असल्याने त्याद्वारे चालत्या, वेगात असलेल्या वाहनाचे छायाचित्र काढणे कठीण असल्याचे मत वाहतूक पोलिसांनी नोंदवले.

Web Title: Big news: Now action will be taken against 'Khaki' if a challan is issued by taking a photo on a mobile phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.