मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बदली झालेल्या १४७६ शिक्षकांची होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:41 IST2025-12-18T15:38:28+5:302025-12-18T15:41:30+5:30
प्राथमिक शिक्षण विभागाचा निर्णय; संवर्ग -१ मध्ये बदली झालेल्या सर्वच शिक्षकांचा समावेश

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बदली झालेल्या १४७६ शिक्षकांची होणार चौकशी
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांतील गोंधळाच्या चाैकशीने आता निर्णायक वळण घेतले आहे. बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे उघडकीस आल्यानंतर ९ शिक्षकांना निलंबित करण्यात आल्यानंतर ४९ शिक्षकांच्या चौकशीचे आदेश निघाले आहेत. त्यात ४९ शिक्षकांची संघटनांकडून मिळालेली यादीच वादात सापडली आहे. त्यामुळे बदल्यांतील संवर्ग-१ मधील सर्वच १४७६ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यात सर्वच संवर्गातील ३ हजार ६७८ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांसाठी विविध संवर्ग पाडण्यात आले होते. त्या संवर्गाचा लाभ घेण्यासाठी संबंधित शिक्षकांकडून ऑनलाइन माहिती मागविली होती. त्या माहितीमध्ये काही शिक्षकांनी खोटी माहिती सादर केली. काहींनी सोयीच्या ठिकाणी, जवळच्या ठिकाणी बदलीसाठी शारीरिक अपंगत्वाची, आजारपणाची खोटी प्रमाणपत्रे जोडल्याचे समजले. या प्रकरणांमध्ये विविध शिक्षक संघटनांनी निवेदने देत चौकशीची मागणी केली. त्यासाठी आंदोलनेही करण्यात आली. त्यावरून ९ शिक्षकांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतरही तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता शिक्षण विभागाने बदलीत ‘संवर्ग-१’चा लाभ घेणाऱ्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांच्या तपासणीचा निर्णय घेतला. त्यानुसार विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. त्यात १ हजार ४७६ शिक्षकांचा समावेश संवर्ग १ चा लाभ घेणाऱ्यांच्या यादीत आहे.
‘त्या’ शिक्षकांची चौकशी लांबणीवर
शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने दिलेल्या स्मरणपत्रासोबत ४९ शिक्षकांची चाैकशीसाठी यादी जोडण्यात आली होती. त्या शिक्षकांच्या चौकशीचे आदेश शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी काढले होते. परंतु संबंधित समन्वय समितीचे पत्रच बनावट असल्याचा दावा काही संघटनांनी केला. त्यामुळे ‘त्या’ ४९ शिक्षकांची चौकशी लांबणीवर पडल्याची माहिती आहे. याविषयी शिक्षक भारती संघटनेतर्फे सरसकट तपासणी करण्याची मागणी केली. तसेच ४९ शिक्षकांची नावांची यादी तयार करीत त्यांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कार्यवाहीची मागणीही संघटनेने सीईओ अंकित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर राज्य संपर्कप्रमुख संतोष ताठे, जिल्हाध्यक्ष राजेश भुसारी, संजय बुचुडे, प्रशांत नरवाडे, विजय ढाकरे, देवानंद सुरडकर, बाबासाहेब शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.