पोस्टाचा मोठा निर्णय; ब्रिटिश काळापासूनची ‘रजिस्टर्ड एडी’ बंद; आता केवळ ‘स्पीड पोस्ट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 20:11 IST2025-08-02T20:10:05+5:302025-08-02T20:11:00+5:30
ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या शिस्तबद्ध आणि कायदेशीर मूल्य असलेल्या या सेवेचा शेवट होत असल्याने अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या.

पोस्टाचा मोठा निर्णय; ब्रिटिश काळापासूनची ‘रजिस्टर्ड एडी’ बंद; आता केवळ ‘स्पीड पोस्ट’
छत्रपती संभाजीनगर : टपाल खात्याच्या नव्या निर्णयानुसार, १ ऑगस्टपासून पारंपरिक ‘नोंदणीकृत पत्र’ सेवा (रजिस्टर्ड एडी) बंद करण्यात आली आहे. ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या शिस्तबद्ध आणि कायदेशीर मूल्य असलेल्या या सेवेचा शेवट होत असल्याने अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या.
आता नोंदणीकृत पत्राची जागा स्पीड पोस्ट सेवेला दिली जाणार असून, त्यामध्येच ट्रॅकिंग, पोच पावती, कायदेशीर दस्तऐवजांची पाठवणी या सुविधा असतील. परिणामी, ‘नोंदणीकृत पोस्ट’ आणि ‘पोच पावती’ यांसारख्या पारंपरिक संज्ञा आणि प्रक्रियाही आता इतिहासजमा झाल्यात.
‘नोंदणीकृत पत्र’ म्हणजे एक कायदेशीर दस्तावेज होता. परीक्षा निकाल, न्यायालयीन नोटीस, सरकारी आदेश किंवा गावातील एखाद्याची महत्त्वाची सूचना हे सर्व नोंदणीकृत पत्राने पोहोचविले जात असे. हे सगळे आता इतिहासजमा झाले आहे. नवीन प्रणालीतून सेवांचा वेग, ट्रॅकिंगची सुविधा आणि डिजिटल युगाशी जुळवून घेण्याची तयारी दिसते. नव्या टपाल व्यवस्थेतील हा महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. मोबाइलमुळे पूर्वी तार (टेलिग्रॅम) सेवा अशीच बंद झाली होती.
‘ते’ पत्र इतिहासजमा
लोकांच्या मनात नोंदणीकृत पत्राच्या आठवणी जाग्या आहेत. कोणी तरी अज्ञात लेखकाने लिहिलेल्या एका भावनिक निवेदनात म्हटलंय, “स्पीड येतोय, पण ‘नोंद’ हरवतेय... पोस्टमनच्या हातून मिळालेलं ते पत्र आता केवळ सिस्टीमच्या मेल ट्रॅकवर दिसणार आहे.”
ॲडव्हान्स पोस्ट टेक्नॉलॉजी
नवीन प्रणालीचा औपचारिक शुभारंभ १ ऑगस्ट रोजी करण्यात आला आहे. ‘आयटी २.०’ अंतर्गत या नवीन प्रणालीच्या वापराने टपाल सेवा अधिक स्मार्ट, सुरक्षित, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख होणार आहेत. या माध्यमातून देशभरातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये ४ ऑगस्टपासून नवीन प्रणाली कार्यान्वित होत आहे. शहरात नवीन प्रणालीचा शुभारंभ मुख्य डाकघरात उत्साहात पार पडला. यावेळी पोस्टमास्तर जनरल संजय बागुल, वरिष्ठ अधीक्षक डाकघर श्री. पी. मुथुराज, प्रवर अधीक्षक, बीड- एस. पी. हिरसिगे आणि प्रवर डाकघर अधीक्षक सुरेश बनसोड उपस्थित होते.