मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 12:33 IST2025-09-13T12:31:53+5:302025-09-13T12:33:36+5:30
पक्षाकडून उपेक्षा झाल्याचा आरोप करत मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी दिला राजीनामा

मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी शनिवारी(दि.१३) रोजी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. पक्षाकडून कमी अपेक्षा ठेवूनही वाट्याला उपेक्षाच आल्याने पक्षाचा राजीनामा देत असल्याचे महाजन यांनी समाजमाध्यमावर जाहिर केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसे एकत्र येत आहेत. दोन्ही पक्षांनी शुक्रवारी नाशिक येथे मोठा मोर्चा काढला. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे छत्रपती संभाजीनगर येथील प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी शनिवारी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे फेसबुक या समाजमाध्यमावर जाहिर केले. याविषयी ते म्हणाले की, कुठंतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेल्या काही दिवसांपासून मनात येत होती. खरे म्हणजे यापूर्वीच थांबायला पाहिजे होते. कुठल्याही पक्षात राहिलो तरी निवडणुकीचे तिकिट मिळत नव्हते. केवळ हिंदुत्वाचा विचार जगला पाहिजे यासाठी आपण पक्षात होतो.
अमित ठाकरे मला समजून घेतील
विधानसभा निवडणुकीच्यावेळी आपल्याला वापरण्यात आले. जी चूक झाली नाही, त्याचे प्रायश्चित करायला लावले. छत्रपती संभाजीनगरच्या सभेत आपण राज यांना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या मुलासोबत काम करेन अशी ग्वाही दिली होती. मात्र मी आता थांबू शकत नाही, याबद्दल अमित ठाकरे मला समजून घेतील,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.