कर्नाटकातील कलबुर्गीत पकडला कुख्यात गुन्हेगार; दरोडा, खुनाच्या घटनेत होता फरार, गुन्हे शाखेची मोठी कारवाई
By राम शिनगारे | Updated: September 25, 2022 20:42 IST2022-09-25T20:40:46+5:302022-09-25T20:42:37+5:30
रुपेश ऊर्फ डोंगऱ्या याने साथीदारांच्या मदतीने वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथील शेतवस्तीवर दरोडा टाकत एका मुलाचा खून केला होता. यात महिलांवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ही घटना २ जुलै २०२१ रोजी घडली होती.

कर्नाटकातील कलबुर्गीत पकडला कुख्यात गुन्हेगार; दरोडा, खुनाच्या घटनेत होता फरार, गुन्हे शाखेची मोठी कारवाई
औरंगाबाद- शेतवस्तीवर राहणाऱ्या कुटुंबावर हल्ला करीत त्यातील एकाचा खून केल्यानंतर फरार झालेला कुख्यात गुन्हेगार रुपेश ऊर्फ डोंगऱ्या शिवराम चव्हाण (रा. कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. नगर) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) कर्नाटकातील कलबुर्गी शहरात बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी दिली.
रुपेश ऊर्फ डोंगऱ्या याने साथीदारांच्या मदतीने वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथील शेतवस्तीवर दरोडा टाकत एका मुलाचा खून केला होता. यात महिलांवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ही घटना २ जुलै २०२१ रोजी घडली होती. ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्यातील सहभागी इतर दोन आरोपींना अटक केली होती. मात्र, सूत्रधार रुपेश फरार होता. त्याच्या शोधासाठी पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी एक विशेष पथक तयार केले होते. या पथकाने अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद शहर व जिल्ह्यात त्याचा शोध घेतला. मात्र, तो प्रत्येक वेळी ओळख लपवून पळून जाण्यात यशस्वी ठरला. एलसीबीच्या पथकास रुपेश हा कर्नाटकातील कलबुर्गी शहरात मजुरीसह चोऱ्या करून राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी कलबुर्गी शहरातून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास औरंगाबाद येथे आणल्यानंतर वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक रेंगे, उपनिरीक्षक विजय जाधव, हवालदार श्रीमंत भालेराव, वाल्मीक निकम, महेश बिरुटे, वाल्मीक बनगे यांच्या पथकाने केली.