भीमसागर उसळला
By Admin | Updated: April 15, 2016 01:44 IST2016-04-15T01:39:14+5:302016-04-15T01:44:22+5:30
नांदेड : कोटी कोटी दलित, शोषित, वंचितांच्या पाठीवर आत्मभान व आत्मविश्वासाची शिदोरी बांधून त्यांना गुलामगिरीच्या शृखंलेतून मुक्त करणारे प्रज्ञासूर्य, महामानव

भीमसागर उसळला
नांदेड : कोटी कोटी दलित, शोषित, वंचितांच्या पाठीवर आत्मभान व आत्मविश्वासाची शिदोरी बांधून त्यांना गुलामगिरीच्या शृखंलेतून मुक्त करणारे प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी गुरूवारी भीमसैनिकांचा महासागर नांदेडच्या रस्त्यावर उसळला़
डीजेच्या तालावर नाचत आणि जयभीमचे नारे देत निघालेल्या मिरवणुकीतील लहानथोरांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले़ युगपुरूषाला त्रिवार अभिवादन करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत शहर व परिसरातील लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता़
भीमसैनिकांनी सकाळपासूनच रेल्वेस्थानक परिसरातील भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादनासाठी गर्दी केली होती़ यावेळी विविध संघटनाचे प्रतिनिधी, राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़ विविध सामाजिक व राजकीय संघटना तसेच प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़
उन्हाची पर्वा न करता भीमगीतांवर हजारो मुले देहभान विसरून नाचत होते़ रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीतील जल्लोषाच्या लाटा एकामागून एक उसळत होत्या़ शहरातील सर्व भागातून दुपारनंतर मिरवणुका निघाल्या़ मिरवणुकाद्वारे डॉ़ बाबासाहेब यांचा संदेश देणारे फलक तसेच विविध देखावे सादर करण्यात आले़
डॉ़ आंबेडकर, महात्मा फुले, तथागत गौतम बुद्ध, संविधान, संसद भवन, अशोकचक्र आदींचे देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते़ लेझीम पथक, पथनाट्याचेही आयोजन मिरवणुकीत केले होते़ हातात पंचरंगी ध्वज, निळा ध्वज घेतलेले तरूण आपल्याच धुंदीत नाचताना दिसत होते़ तरोडानाका, वर्कशॉप, श्रीनगर, शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद चौरस्ता, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच जिल्हा परिषदेसमोरील रस्ता गर्दीने फुलून गेला होता़़ सामाजिक संघटनांनी ठिकठिकाणी थंडपाणी तसेच अन्नदानाची व्यवस्था केली होती़ दरम्यान, शहरात सकाळी ठिकठिकाणी पंचशिल ध्वजारोहण, वंदना व सभांचे आयोजन केले होते़ नवे वस्त्र परिधान करून महिला, पुरूष व लहानमुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला़ बौद्धविहार तसेच घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या़ घरावर विद्युत रोषणाई केली होती़
मान्यवरांनी केले अभिवादन
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले़ आ़ अमिता चव्हाण, आ़ डी़ पी़ सावंत, आ़ हेमंत पाटील, जि़ प़ अध्यक्षा मंगला गुंडले, महापौर शैलजा स्वामी, उपमहापौर शफी कुरेशी, सभापती अमिता तेहरा, बी़ आऱ कदम, मंगला निमकर, विजय येवनकर, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, आयुक्त सुशील खोडवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, माजी खा़ डॉ़ व्यंकटेश काब्दे, समाजवादी नेते सदाशिवराव पाटील, डॉ. किरण चिद्रावार, प्राचार्य डॉ. व्ही. एन. इंगोले, प्रा़ बालाजी कोंपलवार, भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, बिशन यादव, आरती पुरंदरे, बीएसपीचे सुरेश गायकवाड, नागेश सावंत, किशोर भवरे, उमेश पवळे, प्रफुल्ल सावंत, राष्ट्रवादीचे डॉ़सुनील कदम, कल्पना डोंगळीकर, सविता कंठेवाड, गणेश तादलापूरकर, बापुराव गजभारे, संतोष मुळे, नरेंद्र चव्हाण, सुखदेव चिखलीकर, प्रा़ सदाशिव भुयारे, जयपाल रेड्डी, शिवसेनेचे प्रकाश कौडगे, मिलिंद देशमुख, विनय सगर, माधव पावडे, चंद्रकांत बुक्तरे, विश्वनाथ कडेकर, युसुफ मैनोदिन, प्रवीण खंदारे, शिवा कांबळे, संजय बेळगे, स्वप्नील चव्हाण, वंदना लहानकर, पद्माकर केंद्रे, डॉ़ सुधीर भातलवंडे, कोमवाड, डॉ़ काळभोर, खमितकर, संदीपकुमार सोनटक्के, डॉ़ मिनाक्षी कागडे, रमेश सरोदे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)