खबरदार... रस्त्यावर वाहने उभी केली तर !
By Admin | Updated: April 28, 2016 23:54 IST2016-04-28T23:35:10+5:302016-04-28T23:54:21+5:30
औरंगाबाद : लग्न समारंभ, कार्यक्रमासाठी आलेल्या आतिथीचे एकही वाहन यापुढे रस्त्यावर उभा राहता कामा नये, तसे आढळले आणि जर वाहतूक खोळंबली तर थेट तुमच्यावर गुन्हे नोंदवू,

खबरदार... रस्त्यावर वाहने उभी केली तर !
औरंगाबाद : लग्न समारंभ, कार्यक्रमासाठी आलेल्या आतिथीचे एकही वाहन यापुढे रस्त्यावर उभा राहता कामा नये, तसे आढळले आणि जर वाहतूक खोळंबली तर थेट तुमच्यावर गुन्हे नोंदवू, सील ठोकू, असा सज्जड दम गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील हॉटेल्स, मंगल कार्यालयाच्या मालक आणि व्यवस्थापकांना भरला.
गुरुवारी आयुक्तांनी लग्न, विविध समारंभासाठी जागा भाड्याने देणाऱ्या शहरातील पंचतारांकित हॉटेलसह, सर्व मंगल कार्यालय चालक, व्यवस्थापकांची बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले.
शहरातील अनेक हॉटेल्स, मंगल कार्यालयांकडे पार्किंगसाठी पुरेशी जागाच नाही. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या समारंभाच्या वेळी येणारे आतिथी रस्त्यावरच वाहने उभी करतात आणि वाहतुकीची मोठी कोंडी होते. असे प्रकार सतत घडत आहे. बुधवारी रात्री जालना रोडवरील अजंटा अॅम्बेसिडर हॉटेलमध्ये असलेल्या एका विवाह समारंभामुळे जालना रोडवर तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. तसेच चार दिवसांपूर्वी पीव्हीआर सिनेमागृहासमोर अशाच कारणाने झालेल्या कोंडीमुळेच एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी शहरातील मंगल कार्यालय, हॉटेल्स व लॉन्स मालक, व्यवस्थापकांची अलंकार सभागृहात बैठक बोलावली होती. यावेळी आयुक्त म्हणाले, समारंभाच्या ठिकाणी रस्त्यावर वाहने उभी केली जाणार नाहीत. आपल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, याची संपूर्णपणे जबाबदारी संबधित हॉटेल, मंगल कार्यालयाच्या मालक व व्यवस्थापकांचीच आहे. आता फार झाले, यापुढे एकही वाहन रस्त्यावर दिसले तर थेट हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
१ मेपर्यंत ज्यांच्याकडे लग्न ‘बुक’ आहेत, त्यांनी स्वयंसेवक ठेवून रस्त्यावर वाहने उभी करू देऊ नयेत. याकरिता पोलिसांची गरज वाटत असेल तर पैसे भरल्यानंतर ते उपलब्ध करून दिले जातील. ज्यावेळी लग्नाची तारीख ‘बुक’ केली जाते, त्याच वेळी किती पाहुणे येणार याचे नियोजन करून पार्किंगची सोय उपलब्ध करून द्यावी, अन्यथा रस्त्यावर उभी करण्यात आलेली वाहने पोलीस उचलून नेतील व मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
लॉन्स, हॉटेल्स व मंगल कार्यालयांच्या बिल्ंिडग प्लॅनचीही तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये पार्किंगला पुरेशी जागा आहे का, हे पाहिले जाईल. तसेच मालक व व्यवस्थापकांनी लग्न समारंभासाठी पोलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. बैठकीला उपायुक्त संदीप आटोळे, वसंत परदेशी, राहुल श्रीरामे आदींची उपस्थिती होती.
सर्वेक्षण सुरू
शहरातील ज्या हॉटेल्स, मंगल कार्यालयांमध्ये पुरेशी पार्किंग सुविधा नाही, जेथे रस्त्यावरच वाहने उभी केली जातात, जेथे सतत वाहतुकीची कोंडी होते, अशांचा गुरुवारपासून पीसीआर मोबाईल व्हॅन व चार्ली पथकामार्फत सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.
१ मेपर्यंत हा सर्व्हे सुरू राहणार असून, ज्याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्याकरिता संबंधितांना १२ मेपर्यंत सुधारणेची मुदत दिली जाईल. त्यामध्ये सुधारणा नाही झाली तर १३८ सीआरपीसी खाली नोटीस देऊन ते कायमस्वरुपी सील करण्यात येईल.
शिवाय त्या- त्या भागातील सहायक पोलीस आयुक्त सर्वेनंतर पाहणी करतील.
यामध्ये प्रामुख्याने बांधकाम नकाशात पार्किंगसाठी ठेवलेली जागा व प्रत्यक्षात असलेल्या जागेची पाहणी करण्यात येणार आहे.
काही जणांनी पार्किंगच्या जागेवर स्वयंपाकघर व गोडाऊन केले आहे, याचीदेखील पाहणी केली जाणार आहे.
... अन्यथा व्यवसाय बंद करा
समारंभासाठी येणारे अनेक जण पार्किंग असूनही, रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होत असल्याच्या शंका काही व्यवस्थापकांकडून उपस्थित करण्यात आल्या.
यावर अमितेशकुमार यांनी व्यवसाय होत नसेल तर बंद करा, असे म्हणून त्यांना चांगलेच फटकारले. त्यामुळे अनेकांची भंबेरी उडाली.