सिल्लोडमध्ये १४ महापुरुषांचे पुतळे उभारण्याच्या परवानगीस खंडपीठाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 14:14 IST2025-02-12T14:14:02+5:302025-02-12T14:14:55+5:30

जनहित याचिका प्रलंबित असेपर्यंत कुठलाही पुतळा बसवण्यास मनाई

Bench stays permission to erect statues of 14 great men in Sillod | सिल्लोडमध्ये १४ महापुरुषांचे पुतळे उभारण्याच्या परवानगीस खंडपीठाची स्थगिती

सिल्लोडमध्ये १४ महापुरुषांचे पुतळे उभारण्याच्या परवानगीस खंडपीठाची स्थगिती

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडमध्ये १४ महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांंनी दिलेल्या परवानगीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंग़ेश पाटील आणि न्या. प्रफुल्ल खुबाळकर यांनी स्थगिती दिली. यासंदर्भातील जनहित याचिका प्रलंबित असेपर्यंत कोणाचाही पुतळा बसवू नये, असा मनाई आदेश खंडपीठाने दिला.

महेश शंकरपेल्ली यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटल्यानुसार सिल्लोड न.प.तर्फे सर्व्हे नं. १५ मध्ये महापुरुषांचे पुतळे बसविण्याचा ठराव १३ सप्टेंबर २०२४ रोजी संमत करण्यात आला व त्याच दिवशी परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी १४ ऑक्टोबर २०२४ ला रस्त्याच्या कडेला १४ पुतळे बसविण्याची सशर्त परवानगी दिली. शासनाने पुतळे उभारण्यासंदर्भात २ मे २०१७ ला जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्मारकांच्या उभारणीला परवानगी देताना तब्बल २१ बाबी तपासावयास हव्यात. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ काम पाहत आहेत. त्यांना ॲड. एस. आर. सपकाळ, आर. एम. पाटील, अमित गाडेकर आदी सहकार्य करीत आहेत.

पुतळे बसवण्याची जागाच वादातीत
छत्रपती संभाजीनगरमधील जवाहर कॉलनीतील बिरदीचंद दलाई यांच्या शपथपत्रानुसार सिल्लोडच्या सर्व्हे नंबर १५ मध्ये त्यांनी ७३ भूखंड पाडले असून ५६ हजार चौरस फूट खुली जागा सोडली. ती नाममात्र दराने नगर परिषदेला दिली. ३१ जून २००६ रोजी बंधपत्र तयार केले, असे त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्याने माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार गोकुळदास पारेख यांचा वरील जागेचा तो मंजूर ‘ले-आऊट’ असून, त्यात वरील खुला भूखंड आहे. यावरून पुतळे बसवण्याची जागाच वादातीत असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

यांचे पुतळे बसविणार होते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महाराणा प्रताप, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल, संत रविदास, महर्षी वाल्मिकी, शंकरराव चव्हाण आणि माणिकदादा पालोदकर यांचे पुतळे बसविणार होते.

Web Title: Bench stays permission to erect statues of 14 great men in Sillod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.