खंडपीठाचे आदेश धाब्यावर, शहरभर अनधिकृत होर्डिंग; महापालिका प्रशासनाच्या डोळ्यांवर पट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 19:06 IST2024-09-25T19:05:58+5:302024-09-25T19:06:10+5:30
मागील काही दिवसांपासून शहरभर अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स लावण्यात येत आहेत. हे होर्डिंग काढण्याची हिंमत मनपा प्रशासन दाखवायला तयार नाही.

खंडपीठाचे आदेश धाब्यावर, शहरभर अनधिकृत होर्डिंग; महापालिका प्रशासनाच्या डोळ्यांवर पट्टी
छत्रपती संभाजीनगर : शहरात अनधिकृत होर्डिंग लागता कामा नये, अशा कडक शब्दांत खंडपीठाने यापूर्वीच महापालिकेला आदेश दिलेले आहेत. खंडपीठाचे आदेश धाब्यावर बसवत राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स लावत आहेत. अनधिकृत होर्डिंग विद्रुपीकरणात अधिक भर घालत असतानाही महापालिका प्रशासन कारवाई करायला तयार नाही. प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली की काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
पर्यटनाची राजधानी असलेल्या शहरात दररोज हजारो पर्यटक येतात. दिवसभर विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्यावर अनेक पर्यटक शहरात फेरफटका मारतात. मागील काही दिवसांपासून शहरभर अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स लावण्यात येत आहेत. हे होर्डिंग काढण्याची हिंमत मनपा प्रशासन दाखवायला तयार नाही. आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडत नाही, हे घाटी रुग्णालयासमोरील अतिक्रमणे काढताना प्रशासनाने सिद्ध केले. मग होर्डिंग काढण्यासाठी प्रशासन पुढाकार का घेत नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येतोय.
अनधिकृत होर्डिंग मनपा काढत नाही, होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाईसुद्धा करीत नाही, त्यामुळे उदयोन्मुख नेत्यापासून मोठ्या नेत्यांचे होर्डिंग मोठ्या प्रमाणात झळकू लागले आहेत. विशेष बाब, म्हणजे गल्लो-गल्लीत भाऊ, दादा झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे होर्डिंगही लावले जात आहेत. यापूर्वी जेव्हा जेव्हा महापालिकेने हाेर्डिंग काढण्याची माेहीम राबविली, तेव्हा दहा हजार, बारा हजार लहान मोठे होर्डिंग जमा होतात. जप्त केलेले होर्डिंग ठेवण्यासाठीही मनपाकडे जागा शिल्लक राहिलेली नाही.
किती जणांना परवानगी हे बघावे लागेल
होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून परवानगी देण्यात येते. मागील दोन ते तीन दिवसांत किती जणांना परवानगी दिली, याची माहिती घ्यावी लागेल. वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या होर्डिंगचे फोटो काढले. कारवाई सुरू केली. होर्डिंग काढले जातील.
-संतोष वाहुळे, अतिरिक्त आयुक्त, मनपा