अजिंठा लेणीत मधाचे पोळे काढल्यानंतरही उपद्रव; आग्या मोहळाचा पुन्हा २५ पर्यटकांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:54 IST2025-06-30T12:52:50+5:302025-06-30T12:54:02+5:30
मार्च व जून महिन्यांत पर्यटकांवर तीन ते चार वेळा आग्या मोहोळाच्या माश्यांनी हल्ला चढविला होता. यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक जखमी झाले होते.

अजिंठा लेणीत मधाचे पोळे काढल्यानंतरही उपद्रव; आग्या मोहळाचा पुन्हा २५ पर्यटकांवर हल्ला
फर्दापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या आग्या मोहळाच्या पोळ्यांचे स्थलांतरण केल्यानंतर रविवारी (दि. २९) पुन्हा २५ पर्यटकांवर या माश्यांनी हल्ला केला. या जखमी पर्यटकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
मार्च व जून महिन्यांत पर्यटकांवर तीन ते चार वेळा आग्या मोहोळाच्या माश्यांनी हल्ला चढविला होता. यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक जखमी झाले होते. त्यानंतर पुरातत्त्व व वन विभागाने कार्यवाही करून १० जून रोजी लेणी क्र. दहा व इतर ठिकाणी असलेले संपूर्ण पोळे हटविले होते. काही ठिकाणी मधमाश्यांचे छोटे पोळे अजूनही शिल्लक असल्याचे रविवारी पुन्हा दिसून आले. रविवारी दुपारी साडेतीन वाजता लेणी क्र. २५ जवळ या माश्या पुन्हा अवतरल्या व त्यांनी २५ पर्यटकांवर हल्ला केला. यामुळे पर्यटकांची चांगलीच धावपळ झाली.
बाजूच्या बंद पडलेल्या बागेतील झाडावरील आग्या मोहळाने हा हल्ला केलेला असावा. लेणी क्र. २५ जवळ छोटे पोळे आहे, तेही काढले जाईल.
- मनोज पवार, संवर्धन सहायक, पुरातत्त्व विभाग, अजिंठा लेणी
संपूर्ण लेणीच जंगलात असल्याने येथे मधमाश्यांचा अधिवास पूर्वाश्रमीचा आहे. पर्यटकांसाठी धोकादायक ठरलेली पोळे पूर्णत: काढली आहेत, तरीही आज या माश्या परतल्याने त्याकडे लक्ष केंद्रीत केले जाईल. परिसरात अजून कोठे-कोठे पोळे आहेत, याचीही पाहणी करून त्यांचेही स्थलांतरण केले जाईल.
- संतोष दोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी, अजिंठा