बीडमधील सरपंच उद्धव सुरवसे खून खटला; आरोपींची जन्मठेप खंडपीठातही कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:50 IST2025-01-04T12:50:20+5:302025-01-04T12:50:53+5:30
उद्धव सुरवसे खून खटल्यात दोघांची मुक्तता करण्याचाही खंडपीठाचा आदेश

बीडमधील सरपंच उद्धव सुरवसे खून खटला; आरोपींची जन्मठेप खंडपीठातही कायम
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील नेकनूरजवळील कुंभारी येथील तत्कालीन सरपंच उद्धव लिंबाजी सुरवसे यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी बप्पा अशोक विद्यागर, सुधाकर भगवान भालेराव व बाबू लिंबाजी काळे यांची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट व न्या. एन. पी. धोटे यांनी कायम ठेवली.
याच गुन्ह्यातील दोन आरोपी विनोद मधुकर घिगे व राजेंद्र मधुकर घिगे यांची मुक्तता करण्याचा आणि त्यांना ठोठावलेल्या दंडाची रक्कम त्यांना परत करण्याचा आदेशही खंडपीठाने दिला. उद्धव यांचे बंधू भाऊसाहेब सुरवसे यांनी १७ जणांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार तत्कालीन सरपंच उद्धव सुरवसे यांची २० मार्च २०१३ मध्ये निवडणूक व पूर्ववैमनस्यातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. बीडच्या सत्र न्यायालयाने २०१७ मध्ये बप्पा विद्यागर, सुधाकर भालेराव, बाबू काळे, विनोद घिगे व राजेंद्र घिगे यांना खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेविरुद्ध आरोपींनी खंडपीठात धाव घेतली. तर निर्दोष सोडलेल्या आरोपींच्या शिक्षेसाठी तक्रारदार भाऊसाहेब सुरवसे यांनी अपील दाखल केले होते. मात्र खंडपीठाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तक्रारदारातर्फे ॲड. गिरीश नाईक-थिगळे यांनी, आरोपींकडून ॲड. अभय ओस्तवाल, ॲड. सुनील काळदाते, ॲड. पी. एन. मुळे, ॲड. एस. पी. चाटे, ॲड. एम. बी. उबाळे व ॲड. एन. बी. जाधव यांनी, तर सरकारकडून सहायक सरकारी वकील संजय घायाळ यांनी काम पाहिले.