छत्रपती संभाजीनगरहून बीड, धाराशिव गाठता येईल रेल्वेने; नव्या मार्गाला मंजुरी देण्याची हालचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:35 IST2025-02-27T18:34:41+5:302025-02-27T18:35:42+5:30

धाराशिव- बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचा असा होईल फायदा

Beed, Dharashiv can be reached by rail from Chhatrapati Sambhajinagar; Motion to approve the new route | छत्रपती संभाजीनगरहून बीड, धाराशिव गाठता येईल रेल्वेने; नव्या मार्गाला मंजुरी देण्याची हालचाल

छत्रपती संभाजीनगरहून बीड, धाराशिव गाठता येईल रेल्वेने; नव्या मार्गाला मंजुरी देण्याची हालचाल

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरहून आगामी कालावधीत बीड, धाराशिवलारेल्वेने काही तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला धाराशिव- बीड- छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग ‘फास्ट ट्रॅक’वर घेत या प्रकल्पाच्या मंजुरीच्या दृष्टीने सविस्तर तपासणी करण्याची सूचना केली आहे.

छत्रपती संभाजीनगरहून बीड आणि धाराशिवला जाण्यासाठी आजघडीला रस्ते मार्गाशिवाय पर्याय नाही. अनेक वर्षांपासून हे जिल्हे रेल्वेने छत्रपती संभाजीनगरशी जोडण्याची प्रतीक्षा आहे. देशभरातील नव्या रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाची स्थिती जुलै २०२२ मध्ये समोर आली होती. यात धाराशिव- बीड-छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गाचाही समावेश होता. त्यामुळे हा रेल्वे मार्ग लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु सर्वेक्षणानंतर हा रेल्वे मार्ग कागदावरच राहिला. बीडचे खा. बजरंग सोनवणे यांनी या रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. सोनवणे यांना एका पत्राद्वारे या मार्गासंदर्भात माहिती दिली. धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गाच्या मंजुरीच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले आहेत, असे रेल्वेमंत्र्यांनी या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून कागदावर असलेला मार्ग आता मार्गी लागण्याची शक्यता आहे.

रेल्वे मार्गाचा असा होईल फायदा
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर हा रेल्वे मार्ग झाल्यास मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. या मार्गामुळे या तीन जिल्ह्यांमधील लोकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि स्वस्त होईल. प्रवाशांना बस किंवा खासगी वाहनापेक्षा कमी वेळेत आणि कमी खर्चात पोहोचता येईल. याचा थेट फायदा शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांना होईल. व्यापार आणि उद्योगांच्या दृष्टीने हा रेल्वे मार्ग फारच लाभदायक ठरेल. धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या भागांतील कृषी उत्पादनांची सहज वाहतूक होईल.

Web Title: Beed, Dharashiv can be reached by rail from Chhatrapati Sambhajinagar; Motion to approve the new route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.