बीड बायपासची झाली चाळणी; लॉकडाऊनमध्ये वाहतूक ठप्प असतानाही का उखडले रस्ते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 17:26 IST2020-08-21T17:19:02+5:302020-08-21T17:26:17+5:30

रेल्वेस्टेशन, पैठण रोडवरील महानुभाव आश्रम चौकापासून ते झाल्टा फाट्यापर्यंत अतिजिकिरीने वाहने चालवावी लागत आहेत.

Beed bypass road in poor condition due to potholes; Why are the roads dug up even when there is no traffic in the lockdown? | बीड बायपासची झाली चाळणी; लॉकडाऊनमध्ये वाहतूक ठप्प असतानाही का उखडले रस्ते ?

बीड बायपासची झाली चाळणी; लॉकडाऊनमध्ये वाहतूक ठप्प असतानाही का उखडले रस्ते ?

ठळक मुद्देपावसाच्या पाण्यात दडलेला खड्डा वाहनधारकांसाठी ठरत आहे धोकादायकखड्ड्यांची खोली चक्क अर्धा फूट ते दोन फुटांपर्यंत, अशी जीवघेणी आहे.

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये बीड बायपासवर जड वाहनांची वर्दळ बंद होती. कमकुवत डागडुजीने रस्त्याची चाळणी होऊन ठिकठिकाणी पडलेले धोकादायक खड्डे नागरिकांच्या किरकोळ अपघातास कारणीभूत ठरत आहेत. 

रेल्वेस्टेशन, पैठण रोडवरील महानुभाव आश्रम चौकापासून ते झाल्टा फाट्यापर्यंत अतिजिकिरीने वाहने चालवावी लागत आहेत. पावसाच्या पाण्यात दडलेला खड्डा वाहनधारकांसाठी अनभिज्ञ असल्याने वाहन त्यात आदळून अपघातजन्य स्थितीतून सावरताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. 

लॉकडाऊनमध्ये विविध धोकादायक खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बुजविण्यात आले होते. त्यामुळे रस्ता गुळगुळीत झाला होता. बंद सिग्नलची दुरुस्ती करून ते सुरू केले. लॉकडाऊननंतर  वाहतूक सुसाट निघाली असली तरी पावसात रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहनांसाठी व नागरिकांसाठी अडथळा ठरू लागले आहेत. वाहतूक बंद असताना रस्ता का उखडला, असा सवाल सातारा- देवळाई परिसरातील नागरिकांनी तसेच वाहनधारकांनी उपस्थित केला आहे. 

खड्डे की खोदकाम...
या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची खोली चक्क अर्धा फूट ते दोन फुटांपर्यंत, अशी जीवघेणी आहे. पटेलनगर ते रेणुकामाता मंदिर कमानीपासून काही अंतरावर आणि आयप्पा मंदिरासमोर, देवळाई चौकापर्यंत असे अनेक खोल खड्डे या महामार्गावर तयार झाले आहेत. गेल्या आठवड्यात सुरू झालेला संततधार पाऊस उघडला आणि रस्त्यावरील हे जीवघेणे खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे; परंतु हा उपाय तात्कालिक असून या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.  

३ दिवसांत खड्डे बुजविणार
धोकादायक खड्डे बुजवून त्यावर  पेव्हर ब्लॉकने पॅचवर्क केले जात आहे. अति पाण्यामुळे डांबर निखळून जाते. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहिल्याने तसेच तुंबल्यामुळे खड्डे पडले आहेत. मजुरांची संख्या वाढवून बीड बायपासवरील सर्वच खड्डे तीन दिवसांत बुजविले जाणार आहेत. 
- सुनील कोळसे (शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग) 

Web Title: Beed bypass road in poor condition due to potholes; Why are the roads dug up even when there is no traffic in the lockdown?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.