बीडमध्ये गोदाम देता का, गोदाम..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:22 IST2018-03-24T00:23:25+5:302018-03-24T11:22:46+5:30
जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदीची गती मंदावलेली असताना आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीपैकी ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात गेलेली नाही. परिणामी आतापर्यंत केवळ २ हजार ५०० शेतक-यांनाच तुरीचे पेमेंट झाले आहेत. खरेदी केलेल्या तूरीसाठी गोदाम शोधण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे.

बीडमध्ये गोदाम देता का, गोदाम..?
अनिल भंडारी
बीड : जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदीची गती मंदावलेली असताना आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीपैकी ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात गेलेली नाही. परिणामी आतापर्यंत केवळ २ हजार ५०० शेतक-यांनाच तुरीचे पेमेंट झाले आहेत. खरेदी केलेल्या तूरीसाठी गोदाम शोधण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे.
बीड जिल्ह्यातील १४ केंद्रांवर ४० दिवसात ७० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. वास्तविक पाहता या कालावधीत खरेदीचे प्रमाण किमान दुप्पट अपेक्षित होते. परंतु, वखार महामंडळाकडून गोदाम उपलब्ध न झाल्याने खरेदी प्रक्रिया संथपणे होत आहे. आतापर्यंत केवळ २३ हजार क्विंटल तूर शासकीय गोदामात पाठविण्यात आलेली आहे. तर ५० हजार क्विंटल तूर सांभाळण्याची वेळ मार्केटिंग फेडरेशनवर आली आहे. नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर ती रितसर गोदामात पाठविली जाते. त्यानंतर मिळणा-या पावत्यांनुसार संबंधित तूर विकलेल्या शेतकºयांच्या पेमेंटची प्रक्रिया होते. परंतु, ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात न गेल्यामुळे ही तूर विकलेल्या शेतक-यांच्या पेमेंटलाही विलंब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील नाफेडच्या १४ पैकी ५ केंद्रांवर खरेदी केलेल्या तुरीचे शेतकºयांना पेमेंट प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजलगाव तालुक्यातील ३६१, आष्टीतील १८६, गेवराईत १६१, कड्यात २०१ तसेच शिरुर कासार येथील १७५ अशा एकूण ११०४ शेतकºयांना आतापर्यंत तुरीचे पेमेंट मिळाले आहे. खरेदी केंद्रावरील तूर वखारच्या गोदामात डिपॉझिट झाल्याशिवाय पेमेंट मिळत नसल्याने गोदाम उपलब्ध होणे गरजेचे असून, त्यादृष्टीने यंत्रणेने गती घेण्याची गरज आहे.
नवीन समस्या उद्भवण्याआधीच उपाययोजना गरजेची
खरेदी केलेली तूर गोदामात सुरक्षित झाल्यानंतर पावत्या मिळतात. त्यानंतर शेतकºयांचे पेमेंट वाटप करण्यात येते. मात्र तोपर्यंत तूर सांभाळण्याची जबाबदारी मार्केटिंग फेडरेशनवर असते.सध्या ताडपत्री टाकून खरेदी केलेली तूर सुरक्षित असली तरी वातावरणातील बदलामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढू शकते.त्यामुळे नाफेडकडून निकषांवर बोट ठेवून तूर अपात्र ठरविली जाऊ शकते. नवीन समस्या निर्माण होण्याआधी ही बाब शासन यंत्रणेने लक्षात घेणे महत्वाचे आहे.