वेळीच सावध व्हा, अंघोळीला अतिगरम पाणी; थंडीत ‘हार्ट अटॅक’चा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 19:50 IST2024-12-13T19:49:45+5:302024-12-13T19:50:02+5:30
पुन्हा एकदा थंडीत वाढ; गरम पाण्याने अंघोळ केल्यास मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. शरीराला आराम मिळतो. मात्र...

वेळीच सावध व्हा, अंघोळीला अतिगरम पाणी; थंडीत ‘हार्ट अटॅक’चा धोका
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा एकदा थंडी वाढू लागली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जातात. सकाळी अंघोळ करताना अनेकजण अतिगरम पाणी घेतात. मात्र, अतिगरम पाण्याने अंघोळ करणे, हे हृदयरोगाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वेळीच सावध झालेले बरे.
हृदयरुग्णांसाठी अतिगरम पाणी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हलक्या गार पाण्याने अंघोळ करणे किंवा शरीराचा तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी तापमानाच्या मध्यम पातळीवरील पाणी वापरणे योग्य ठरते. गरम पाण्याने अंघोळ करीत असताना शरीराच्या सहनशक्तीचा विचार करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
तणावमुक्तीसाठी गरम पाण्याची अंघोळ
गरम पाण्याने अंघोळ केल्यास मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. शरीराला आराम मिळतो. मात्र, अतिगरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे.
स्नायू मोकळे होतात, रक्तप्रवाह सुरळीत होतो
गरम पाण्याने अंघोळ केल्याने स्नायू सैल होतात. स्नायूच्या वेदना कमी होण्यासही मदत होते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
कडक पाणी, साबणाने अंग तडकते
कडक पाणी आणि साबणाने अंघोळ केल्यास हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचा तडकण्याचाही प्रकार होतो. त्वचा संवेदनशील होऊन खाज येऊ शकते.
कडक पाण्याने अंघोळ केल्यास
रक्तदाब वाढणे : कडक आणि थंड पाणी शरीरावर काहीसा शॉकसारखा परिणाम करते. थंड पाणी शरीराला तत्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी उत्तेजित करते, ज्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि रक्तदाब वाढू शकतो.
हृदयावर ताण वाढणे : थंड पाण्याने अंघोळ केल्याने हृदयाला अधिक मेहनत करावी लागते, कारण शरीराला तापमानाच्या बदलापासून वाचविण्यासाठी हृदयाला अधिक रक्तप्रवाहाची आवश्यकता असते. हे हृदयावर अतिरिक्त ताण आणू शकते.
हृदयरुग्णांनो, थंडीत ही काळजी घ्या
थंडीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. उबदार कपडे परिधान करावे. रूम वार्मरचाही उपयोग करता येईल. अतिथंड, अतिगरम अन्नपदार्थ, पेय टाळले पाहिजे. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाबाची औषधी नियमितपणे घ्यावी.
कोमट पाणी फायदेशीर
थंड अथवा अतिगरम पाणी अंघोळीसाठी घेणे टाळावे. अंघोळीसाठी कोमट पाणी घेणे फायदेशीर राहते.
- डाॅ. गणेश सपकाळ, हृदयरोगतज्ज्ञ