वसुलीच्या चिंतेने बँकांचा पीककर्ज वाटपात आखडता हात, केवळ ६५ टक्के वाटप
By बापू सोळुंके | Updated: September 1, 2023 20:51 IST2023-09-01T20:48:49+5:302023-09-01T20:51:08+5:30
दुष्काळी परिस्थितीचा फटका ; मराठवाड्यात केवळ ६५ टक्केच वाटप

वसुलीच्या चिंतेने बँकांचा पीककर्ज वाटपात आखडता हात, केवळ ६५ टक्के वाटप
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविल्याचे दिसताच बँकांनीही शेतकऱ्यांना कर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक आणि ग्रामीण बँकांनी फक्त ६५ टक्के कर्जाचे वाटप केले आहे.
कर्ज कशासाठी लागते ?
बी-बियाणे, कीटकनाशके, उपकरणे खरेदी, पिकांचे नियोजन, विक्री
सन २०२३-२४ साठी बँकांना उद्दिष्ट किती ?
११ हजार ७७८ कोटी ७१ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत बँकांनी ७ हजार ६६५ कोटी ९५ लाख ४८ हजार रुपये कर्ज वाटप केल्याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. वाटप करण्यात आलेल्या कर्जाची टक्केवारी केवळ ६५.०८ टक्के आहे. ३ लाख ५१ हजार ७०३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी हे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज मिळते परत
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार ४ टक्के व्याजाची रक्कम परत करते. तर राज्य सरकारच्या वतीने पंजाबराव देशमुख शेतकरी पीककर्ज व्याज सवलत योजनेंतर्गत ३ टक्के व्याज असे एकूण ७ टक्के व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना देते. यामुळे शेतकऱ्यांना बिनव्याजी पीककर्ज मिळते.
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ १०.४१ टक्के पीककर्ज
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज वाटप करण्याबाबत नकारघंटाच असते. जालना जिल्ह्याला शासनाने पीककर्ज वाटपाचे दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ १०.४१ टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
जिल्हा---पीक कर्जाची एकूण रक्कम--- टक्केवारी
औरंगाबाद--१०६४ कोटी ४ लाख ९६ हजार- ७३.९५ टक्के
जालना- १२९ कोटी ९६ लाख २६ हजार- १०.४१ टक्के
परभणी-६८४ कोटी ५९ लाख १५ हजार- ४९.३० टक्के
--लातूर-- १ हजार ८०६ कोटी ९३ हजार ---- ९३.०५ टक्के
धाराशिव-९२३ कोटी ९७ लाख ६४ हजार- ६४.१९ टक्के
बीड-१ हजार २३८ कोटी ८३ लाख २२ हजार--७५.५४ टक्के
नांदेड-१ हजार ३३४ कोटी ६५ लाख ९६ हजार-- ७३.६२ टक्के
--लातूर-- ५ हजार ३०३ कोटी ४७ लाख ७५ हजार- ७७.६२ टक्के