पीक कर्ज वाटपात बँकांचा हात आखडता !
By Admin | Updated: November 12, 2014 00:25 IST2014-11-12T00:18:41+5:302014-11-12T00:25:04+5:30
उस्मानाबाद : रबी पेरणीसाठी शेतकऱ्यांना सावकाराचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी पीक कर्ज वाटप करण्यात येते. परंतु, बँकांच्या असहकार धोरणामुळे शासनाच्या या योजनेला खिळ बसत आहे.

पीक कर्ज वाटपात बँकांचा हात आखडता !
उस्मानाबाद : रबी पेरणीसाठी शेतकऱ्यांना सावकाराचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी पीक कर्ज वाटप करण्यात येते. परंतु, बँकांच्या असहकार धोरणामुळे शासनाच्या या योजनेला खिळ बसत आहे. रबी पेरणीसाठी ३२४ कोटी ३५ लाख रूपये इतके पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात आजवर केवळ दहा कोटी ६२ लाख रूपये वाटप करण्यात आले आहेत. बँकांच्या या धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे रहावे लागले. तर काहींना उसणवारीवर पेरणी उरकावी लागली.
मागील दोन वर्षापूर्वीच्या पीक कर्ज वितरणावर नजर टाकली असता, बँकांनी सढळ हाताने कर्ज दिले होते. परंतु, यावेळी बहुतांश बँकांनी हात आखडता घेतला असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. खरिपापेक्षा रबीचे चित्र तर अत्यंत चिंताजनक असल्याचे पहावयास मिळत आहे. खत, बी-बियाण्याचे दर वर्षागणिक वाढत आहेत. त्यामुळे पेरणी करताना शेतकरी मेटाकुटीला येतो. जवळ पैसे नसल्याने शेतकरी पेरणीपूर्वी खत, बी-बियाणे घेत नाही. अचानक पाऊस पडला की बाजारपेठेत शेतकरी गर्दी करतात. अशावेळी त्याच्याकडे आवश्यक पैसेही नसतात. त्यामुळे शेतकरी कसल्याही स्वरूपाचा विचार न करता मिळेल तेथून आणि मिळेल त्या टक्क्यांनी सावकाराकडून पैसे घेवून पेरणी उरकतात. असे असतानाच निसर्गाने साथ दिली नाही, तर तो शेतकरी कर्जबाजारी होतो. आणि कर्जाचा डोंगर कमी होण्याऐवजी वाढतच गेल्याने अनेकवेळा शेतकरी मृत्युला जवळ करतात.
दरम्यान, पेरणीवेळी शेतकऱ्यांना खाजगी सावकाराचे उंबरठे झिजविण्याची वेळ येवू नये, म्हणूच शासनाकडून अत्यल्प दरामध्ये पीक कर्ज देण्यात येत आहे. सुरूवातीचे काही वर्ष पीक कर्ज वाटपाचा आकडा मोठा असायचा. यंदाच्या खरीप पेरणीवेळीही मोठ्या प्रमाणात पीक कर्ज वाटप करण्यात आले. कर्ज परतफेड करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. असे असले तरी जिल्ह्यातील बहुजतांश राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्या पीक कर्ज वाटप करताना हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे. कारण रबी पेरणीसाठी ३२४ कोटी ३५ लाख रूपये इतके कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजअखेर केवळ १० कोटी ६२ लाखांचे वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आजवर केवळ १ हजार ३०० वर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले आहे. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी ३११ कोटी रूपये वितरित करणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
गतवर्षी काही बँकांनी शेतकऱ्यांना एक लाखाचे कर्ज मंजूर केले असता शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर दीड लाखाचा बोजा टाकला आहे. पाच वर्षाची परतफेड असल्या कारणाने उर्वरित ५० हजारांच्या बोजातून प्रत्येक वर्षी दहा हजार रूपये वाढीव दिले जातील, असे सांगितले होते. परंतु, यंदा ऐन कर्ज वाटपावेळी अशा बँकांनी शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे. भूम तालुक्यातील ईट येथील महाराष्ट्र बँक शाखेत हा प्रकार प्रामुख्याने झाल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकाराकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बैठका होवूनही बँका दाद देईनात
४पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकर्सची आढावा बैठक घेण्यात येते. प्रत्येक बैठकीवेळी त्या-त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देवून कर्ज वाटपास गती देण्यास सांगितले जाते. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनाही बँका फारशा दाद देत नसल्याचे कर्ज वाटपाच्या आकड्यांवरून दिसून येत आहे.
बँका शेतकरी संख्या कर्ज वाटप
बँक आॅफ बडोदा २५ ३५
बँक आॅफ इंडीया २० १५
कॅनरा बँक ६६ ४४
स्टेट बँक आॅफ हैद्राबाद ५२९ ३५०
स्टेट बँक आॅफ इंडीया २६५ २२०
युसीओ बँक ०५ ०८
युनियन बँक आॅफ इंडीया ०९ ०८
अॅक्सीस बँक ०२ ०९
एचडीएफसी २३ ५४
आसीआसीआय १४० ७८
महाराष्ट्र ग्रामीण बँक२०९ २२५
पीक कर्ज वाटपात बहुतांश बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे. बँकांचे उंबरठे झिजवूनही बँक अधिकारी दाद देत नसल्याने शेतकरी खाजगी कर्जे घेवून वेळ निभावून नेत आहेत. असे असतानाही शेतकरी संघटना मात्र, मूग गिळून गप्प आहेत. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारी ही नेतेमंडळी गेली कुणीकडे? असा सवालही आता संतप्त शेतकऱ्यांतून उपस्थित केला जावू लागला आहे.