भाजपात गेलेला नेता १५ दिवसांत स्वगृही ठाकरेसेनेत; पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 19:09 IST2025-11-13T19:08:40+5:302025-11-13T19:09:25+5:30
गंगापूर नगरपालिकेच्या राजकारणात उलटफेर; उद्धवसेनेने नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केले

भाजपात गेलेला नेता १५ दिवसांत स्वगृही ठाकरेसेनेत; पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी
गंगापूर : येथील नगरपालिकेच्या राजकारणात बुधवारी मोठा उलटफेर झाला. नुकतेच भाजपात प्रवेश केलेले अविनाश पाटील यांनी १५ दिवसांतच या पक्षाला रामराम ठोकत सहकाऱ्यांसह पुन्हा आपल्या स्वगृही म्हणजेच उद्धवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लागलीच त्यांना उद्धवसेनेने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली.
उद्धवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे अत्यंत विश्वासू अविनाश पाटील यांनी २८ नोव्हेंबर रोजी आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपकडून त्यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा शब्द दिल्याचे बोलले जात होते; मात्र ऐनवेळी भाजपा आपला उमेदवार बदलणार असल्याचे समजताच पाटील यांनी बुधवारी रात्री पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा स्वगृही उद्धवसेनेत प्रवेश केला. यावेळी खैरे यांनी त्यांची पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली.
भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अवघ्या काही दिवसांत पाटील यांच्या या ‘घरवापसी’ने गंगापूर नगरपालिकेच्या राजकारणात नव्या समीकरणांना तोंड फुटले आहे. भाजपच्या स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि दिलेले आश्वासन न पाळल्याने विश्वासघाताची भावना निर्माण झाल्यामुळेच पाटील यांनी पुन्हा उद्धवसेनेची मशाल हाती घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अविनाश पाटील यांना फसवून भाजपात नेल्याचा प्रयत्न झाला होता; मात्र ‘सुबह का भुला श्याम को घर वापस आया, तो उसे भूला नहीं कहते,’ असे यावेळी अंबादास दानवे म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादी श. प. पक्षाचे कानांवर हात
काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र पाटील यांची उमेदवारी जाहीर करताना आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील-डोणगावकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण यांनी सांगितले. यामुळे अविनाश पाटील हे महाविकास आघाडीचे की फक्त उद्धवसेनेचे उमेदवार असतील, याबद्दल गंगापूर शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.